शिरूर येथील बोरा महाविद्यालयात ‘विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळा’ उत्साहात संपन्न


शिरूर येथील बोरा महाविद्यालयात ‘विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळा’ उत्साहात संपन्न

पुणे/शिरूर: महाराष्ट्र राज्य शासनाच्या भाषा विभागाच्या अंतर्गत मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात ‘विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळा’ उत्साहात संपन्न झाली. संशोधनपर लेखनाला दिशा देणे आणि विश्वकोशीय नोंदींची शास्त्रशुद्ध मांडणी कशी करावी, याविषयी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेचे उद्घाटन शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी विश्वकोशासाठी नोंदी लेखन करतानाचे स्वतःचे अनुभव कथन केले. कोणतीही नोंद तज्ज्ञांकडून तपासून घेतल्यानंतरच विश्वकोशात समाविष्ट केली जाते, यावर त्यांनी विशेष भर देत नोंदलेखनातील अचूकता, संदर्भनिष्ठता आणि शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी महाविद्यालयातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला तसेच प्राध्यापक व पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी विश्वकोश लेखनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. प्राचीन काळातील विश्वकोश हे केवळ माहितीचे संग्रह नसून त्या त्या काळातील समाज, विज्ञान, संस्कृती आणि विचारसरणीचे प्रतिबिंब होते. या ग्रंथांनी आधुनिक ज्ञानव्यवस्थेची पायाभरणी केली आणि मानवजातीच्या बौद्धिक विकासाला दिशा दिली असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. सदर कार्यशाळा ही आपली शैक्षणिक व बौद्धिक क्षमता सिद्ध करण्याची महत्त्वपूर्ण संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविकात प्रा. के. एन. गाडेकर यांनी मराठी विश्वकोशाचा इतिहास, उद्दिष्टे आणि नोंद लेखन कौशल्याबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यशाळेला महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. अमन बगाडे विशेष उपस्थित होते. महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमधील तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, मराठी तसेच इतर सामाजिक शास्त्रांच्या प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महाविद्यालयातील काही प्राध्यापकांच्या विश्वकोशात नोंदी प्रकाशित झालेल्या असून काही प्राध्यापक सध्या नोंद लेखनाचे कार्य करीत आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

उद्घाटन समारंभात महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सुनीलदत्त गवरे यांनी महाविद्यालयातील विविध विभाग व उपलब्ध शैक्षणिक सोयी-सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. त्यानंतर झालेल्या स्वतंत्र सत्रात त्यांनी ‘जागतिक धर्म आणि तत्त्वज्ञान’ या विषयावरील नोंद कशी लिहावी, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना विषयाची मांडणी, संदर्भांचा वापर आणि वस्तुनिष्ठ लेखनशैली यावर भर दिला.

मराठी विश्वकोश मंडळ, महाराष्ट्र शासन यांचे विश्वकोश सहाय्यक मा. गेडाम यांनी नोंद लेखनातील तांत्रिक बाबी, टाळावयाच्या सामान्य चुका तसेच आवश्यक घटकांचा समावेश कसा करावा, याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

मराठी विभागाचे विभागप्रमुख डॉ. राजाभाऊ भैलुमे यांनी मराठी विषयातील पीएचडी संशोधकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. संशोधन विद्यार्थ्यांनी नोंद लेखनाची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक व मार्गदर्शकांचे आभार डॉ. क्रांती पैठणकर यांनी मानले. या कार्यशाळेमुळे संशोधनपर आणि संदर्भाधारित लेखनाला नवी दिशा मिळाल्याची भावना या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. सुनील भोईटे यांनी व्यक्त केली.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!