गुणवरे ग्रामपंचायतीतील गैरकारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी!
ग्रामस्थांचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अक्षय घावटे यांना निवेदन
फलटण: गुणवरे तालुका फलटण येथील ग्रामस्थांनी फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अक्षय घावटे ग्रामपंचायतच्या गैरकारभाराविषयी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
विषय : गुणवरे ग्रामपंचायतीतील गैरकारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करणे बाबत.
महोदय
सदर अर्जाद्वारे आम्ही गुणवरे (ता. फलटण, जि. सातारा) येथील ग्रामस्थ आपल्या निदर्शनास आणून देत आहोत की, आमच्या ग्रामपंचायतीमध्ये मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहार होत असून ग्रामस्थांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे खालील मुद्द्यांवर तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, ही नम्र विनंती.
तक्रारीचे मुद्दे पुढीलप्रमाणे –
1) सन 2020 ते 2026 या कालावधीत ग्रामस्थांकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे. परंतु अनेक ग्रामस्थांना त्याच्या पावत्या देण्यात आलेल्या नाहीत तसेच ही रक्कम ग्रामपंचायतीच्या अधिकृत खात्यात जमा करण्यात आली नसल्याची शंका आहे. याबाबत चौकशी करण्यात यावी.
2) सन 2020-21 पासून 15 व्या वित्त आयोग निधीतून शाळा, अंगणवाडी, स्ट्रीट लाईट तसेच RO वॉटर, सोलर एटीएम वॉटर मशीन इत्यादी साहित्य खरेदी करण्यात आले आहे. सदर साहित्य सध्या बंद अवस्थेत असून त्याच्या खरेदी व वापराबाबत चौकशी करण्यात यावी.
3) गावातील बाजारकर मागील 7-8 वर्षांपासून आकृतिबंधाबाहेरील कर्मचाऱ्यामार्फत वसूल केला जात आहे. त्यापैकी केवळ सुमारे 50% रक्कमच ग्रामपंचायतीत जमा होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. याबाबत चौकशी करण्यात यावी.
4) ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दोन घरांसाठी त्यांच्या खाजगी जागेत ग्रामनिधीतून सुमारे ₹1,54,000/- खर्च करून नाळेवस्ती येथे मुरमीकरण केले आहे. सार्वजनिक निधीचा वैयक्तिक कामासाठी वापर झाल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी.
5) दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून अनुसूचित जाती-जमाती वस्तीमध्ये रस्ता न करता इतर ठिकाणी खर्च करण्यात आला आहे. तसेच कोणताही ठराव व जिल्हा परिषद पूर्वपरवानगी न घेता जिल्हा परिषद शाळा गुणवरे येथे रस्ता काढून शाळेच्या जागेत अतिक्रमण करण्यात आले आहे. याची चौकशी करण्यात यावी.
6) सन 2015 पासून घरकुल योजनेअंतर्गत काही पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवून अपात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. काही पक्के घर असलेल्या व्यक्तींनाही घरकुल हप्ते देण्यात आले आहेत. याची चौकशी करण्यात यावी.
7) गावातील सार्वजनिक ठिकाणी (उदा. स्मशानभूमी, अंगणवाडी, शाळा) स्वच्छता काम न करता संबंधित व्यक्तींच्या नावे धनादेश काढण्यात आले आहेत. याबाबत चौकशी करण्यात यावी.
8) आकृतिबंधा बाहेरील कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत नमुना क्रमांक 8 मध्ये फेरफार करून स्वतःच्या नावावर (मिळकत क्रमांक 70) उतारा तयार केला आहे. कोणतेही खरेदीखत किंवा मासिक सभेची मंजुरी नसताना हा उतारा अजय ठकसेन रायते यांच्या नावाने तयार करण्यात आला आहे. याची चौकशी करण्यात यावी.
याशिवाय, ग्रामसभांचे आयोजन गेल्या पाच वर्षांपासून गावाबाहेरील ठिकाणी केले जात असून सर्वसामान्य ग्रामस्थांना माहिती दिली जात नाही. संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित राहत नाहीत. मर्यादित लोकांच्या उपस्थितीत ठराव मंजूर करून नंतर सह्या घेतल्या जातात.
तसेच सुमारे ₹17,00,000/- खर्च करून बांधलेले वाचनालय अद्याप अपूर्ण अवस्थेत असून दोन वर्षांपासून बंद आहे व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही.
वरील सर्व बाबी गंभीर स्वरूपाच्या असून गुणवरे ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व अपहार झालेला आहे. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
अन्यथा, गुणवरे ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा देत आहोत, याची नोंद घ्यावी.
निवेदनावर.गुणवरे (ता. फलटण, जि. सातारा) ग्रामस्थांच्या सह्या आहेत.








