फलटण तालुक्यात उद्यापासून ७ व १४ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे मंडल निहाय आयोजन
ग्रामस्थांनी महसूल विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा -तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव
फलटण : महाराष्ट्र शासन महसूल व अन्य विभागांकडे प्रलंबित असलेल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि विविध शासकीय योजनांची माहिती देऊन योग्य लाभार्थ्यांना त्याचे लाभ प्राप्त करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागांतर्गत शासन निर्णयानुसार फलटण तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १ ची अंमलबजावणी करण्यात आहे.७ व १४ मार्च रोजी महसूल मंडल निहाय शिबीरे आयोजित करण्यात येत असून त्याचा संबंधितांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले आहे.
फलटण तालुक्यातील सर्वसामान्य जनता,शेतकरी,महिला,विद्यार्थी आदी समाज घटकांचे महसूल व अन्य शासकीय विभागांशी संबंधीत दैनंदिन प्रश्नांचे निराकरण व त्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याबरोबर विशेषतः महसूल खात्याच्या माध्यमातून वारस नोंद, लक्ष्मी मुक्ती, अपाक नोंदी, एक्यूम्या इत्यादी नोंदी अद्ययावत करणेसाठी जिवंत ७/१२ मोहिम राबविण्यात येणार आहे, सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेऊन त्यांना लाभ देणे, तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार व हस्तांतरणाबाबत (अकृषक जमिनी) गाव निहाय यादी तयार करणे, महसूल मंडल स्तरावरील सर्व शाळांमध्ये दाखले शिबीरांद्वारे विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वितरण करणे, भोगवटादार वर्ग २ जमीन वर्ग व भोगवटादार १ मध्ये नियमानुसार परावर्तित करणे, नवीन व कृषक तरतुदी संदर्भात सुधारणांबाबत मार्गदर्शन करणे, भूसंपादन केलेल्या अकृषक परवानगी दिलेल्या प्रकरणाची कमी जास्त पत्रके करुन गाव दप्तर अद्ययावत करणे, ई – मोजणी अंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वाटप, वारस नोंदी, नकाशा वाटप, ॲग्री स्टॅक (फार्मर आयडी), पी. एम. किसान योजनेंतर्गत लँड सिलिंग, आधार सिडींग, इ – केवायसी आदी कामकाज करणे यासह अन्य शासकीय यंत्रणांकडील कामकाज या शिबीराद्वारे करण्यात येणार आहे, तरी ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १ अंतर्गत शनिवार ता. ७ मार्च रोजी, गिरवी महसूल मंडलात कुरवली खुर्द ग्रामपंचायत कार्यालय, कोळकी महसूल मंडलात आशीर्वाद मंगल कार्यालय ठाकूरकी, बरड महसूल मंडलात राजुरी येथील नाथाचे मंदिर, आसू मंडलात खंडोबा मंदिर साठे फाटा आणि राजाळे महसूल मंडलात मारुती मंदिर राजाळे येथे या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १ अंतर्गत शनिवार दि. १४ मार्च रोजी तरडगाव महसूल मंडलात जुनी ग्रामपंचायत चावडी तरडगाव, आदर्की बुद्रुक मंडलात भैरवनाथ मंदिर आदर्की बुद्रुक, होळ महसूल मंडलात दत्त मंदिर काळज आणि वाठार निंबाळकर महसूल मंडलात विठ्ठल रुक्मिणी मंदिर ताथवडा येथे या शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
“फलटण तालुक्यात शनिवार दि. ७ मार्च आणि शनिवार दि.१४ मार्च असे दोन टप्प्यात सदर शिबीरांचे आयोजन करण्यात येत असून तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिक,शेतकरी आणि महिलांनी आपल्या गावाच्या नजीकच्या ठिकाणी आयोजित केलेल्या या समाधान शिबिराचा लाभ घ्यावा” असे आवाहन तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव यांनी केले आहे









