म्हसवडच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाचे ‘सुस्टा’ परीक्षेत दैदिप्यमान यश
हर्षद मगर जिल्हास्तरावर द्वितीय तर विद्यापीठ स्तरावर तृतीय; आदित्य भालेरावचाही डंका
म्हसवड: (प्रतिनिधी)
शिवाजी युनिव्हर्सिटी स्टॅटिस्टिकल टीचर्स असोसिएशन (SUSTA) च्या वतीने १३ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘सुस्टा ऑनलाइन लेखी क्विझ स्पर्धा २०२६’ मध्ये म्हसवड येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या, श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. बी.एस्सी भाग-१ मध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा आणि विद्यापीठ स्तरावर मानाचे स्थान पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेत हर्षद दिलीप मगर या विद्यार्थ्याने सातारा जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला, तर शिवाजी आणि सोलापूर विद्यापीठ अशा दोन्ही विद्यापीठांच्या संयुक्त गुणवत्ता यादीत त्याने तृतीय क्रमांक मिळवून विशेष ठसा उमटवला. तसेच, आदित्य संतोष भालेराव याने सातारा जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक मिळवून आपले यश अधोरेखित केले.
या विद्यार्थ्यांना संख्याशास्त्र (Statistics) विभागाचे प्रा. हर्षवर्धन कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,फ.ए.सो.चे खजिनदार मा. हेमंत रानडे, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य ॲड. श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर, श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विकास काकडे सर, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संख्याशास्त्र सारख्या विषयात विद्यापीठ स्तरापर्यंत मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.









