तांबमाळ येथे नैसर्गिक स्त्रोतामध्ये बनवला हायवे रस्ता!
NHAI Rkc इन्फ्रा कंपनीवर कारवाही करणार का? उद्या ना.नितीन गडकरी दौऱ्यात वस्तुस्थितीदर्शक पाहणी करणार का? की नुसता दिखावा!
हायवेच्या नावाने चांगभले – भाग-1
फलटण: उद्या केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा पुणे पंढरपूर पालखी दौरा असून
महामार्ग पाहणी दौरा होणार आहे. यामध्ये ते खरंच तालुक्यातील बनवलेल्या रस्त्याच्या अडचणी सोडवणार का? की नुसता पाहणी दौरा करणार हे उद्या पहायला मिळणार आहे.आपण Ap न्यूज महाराष्ट्र च्या माध्यमातून फलटण तालुक्यातील बनवलेल्या अडचणी मांडणार आहोत. जेणेकरून ही माहिती ना.नितीन गडकरी यांच्या कडे पोहचेल व ते समस्या समजून घेतील व सोडवतील.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या पुणे–पंढरपूर पालखी महामार्ग प्रकल्पातील कामांबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः पुणे कडून फलटण शहरात येणाऱ्या मार्गावर तांबमाळ येथील ओढ्यावर करण्यात आलेल्या कामामुळे अपघाताचा धोका वाढल्याची भीती व्यक्त होत आहे. ओढ्याला जास्त पाणी आल्यास हा रस्ता पाण्याखाली जाणार असून यामुळे गंभीर अपघात होऊ शकतो.
तांबमाळ परिसरात ओढ्यावर असलेल्या पुलाखालून थेट रस्ता काढण्यात आला आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी त्याची रचना अत्यंत धोकादायक असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पुण्याकडून फलटणमध्ये प्रवेश करताना प्रथम अचानक वळण, त्यानंतर ओढ्यातून जाणारा मार्ग आणि लगेच पुन्हा दोन वळणे अशी रचना असल्याने वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे.
स्थानिकांच्या मते, या ठिकाणी सरळ आणि सुरक्षित मार्गाची आवश्यकता असताना अनावश्यक वळणे देऊन रस्ता काढण्यात आला आहे. नागरिकांनी याठिकाणी स्वतंत्र टनेल किंवा सरळ मार्ग तयार करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे अपघात टाळता येतील आणि वाहतूक सुरळीत होईल.
दरम्यान, पालखी महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नसून ते अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. या प्रकल्पाची मुदत ऑक्टोबर २०२३ मध्येच संपली असतानाही काम अपूर्ण आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या सर्व त्रुटींमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून आवश्यक बदल करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
पुणे पंढरपूर पालखी मार्गावर बाह्यवळण चौकातून फलटणला येण्यासाठी नैसर्गिक स्त्रोत असलेल्या ओढ्यातून बनवलेला रस्ता चुकीचा असून हा रस्ता सरळ उड्डाणपूल तयार करून फलटणकडे जाण्यासाठी बनवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. संबंधित RKC इन्फ्रा कंपनीवर काय कारवाई होणार? ना.नितीन गडकरी या दौऱ्यात वस्तुस्थितीदर्शक पाहणी करणार की नुसता पाहणीचा दिखावा होणार हे ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.









