फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी:फलटण तालुका काँग्रेस पार्टीचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना निवेदन!
काँग्रेस पार्टी सत्ताधारी भाजप गटाशी संघर्षाच्या भूमिकेत! काँग्रेसचा एकच नगरसेवक सत्ताधाऱ्यांना भारी?
फलटण: दिनांकः १० ऑगस्ट २०२६ फलटण तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीने फलटणचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना निवेदन दिले आहे . निवेदनात म्हटले आहे की,
प्रति,
मा. मुख्याधिकारी साहेब, फलटण नगर परिषद, फलटण.
विषयः फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत आणि तातडीने दुरुस्ती नवीन करणेबाबत…
महोदय,
उपरोक्त विषयान्वये आपले लक्ष वेधून घेऊ इच्छितो की, फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची सद्यस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे आणि पडलेले चर यांमुळे वाहन चालवणे अत्यंत धोकादायक बनले आहे. तसेच पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना पाठीचे व मणक्याचे विकार जडले असून, काही ठिकाणी गंभीर अपघातही झाले आहेत. येत्या काही दिवसांत गौरी-गणपतीचा मोठा सण येत आहे. शहरातील अनेक सार्वजनिक मंडळांचे गणपती आगमन, विसर्जन मिरवणुका तसेच घरगुती गणपती याच प्रमुख रस्त्यांवरून नेले जातात. खराब रस्त्यांमुळे सणासुदीच्या काळात वाहतुकीची कोंडी होण्याची आणि अपघात घडण्याची मोठी शक्यता आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खालील प्रमुख रस्ते तातडीने नव्याने तयार करण्यात यावेत, ही विनंती
१) भगवान महावीर स्तंभ ते आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक चौक ते महात्मा गांधी चौक ते तेली गल्ली ते चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर ते नेहरू पुतळा (बारस्कर गल्ली)
२) शंकर मार्केट ते शुक्रबार तालीम गणपती मंदिर
३) निर्मलादेवी प्रा. विद्यामंदिर ते उपळेकर महाराज मंदिर
४) ॲड.नरेंद्र कृष्णचंद्र भोईटे घर ते ॲड एन. एम. यादव घर
५) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पाचबत्ती चौक
६) आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक चौक ते रथखाना
फलटण शहरात पालखी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम चालू आहे, यामध्ये काही ठिकाणी उदा. गिरवी नाका चौक ते यशवंतराव चव्हाण हायस्कूल मैदानाच्या समोर तसेच पृथ्वी चौका जवळ अशा काही ठिकाणी रस्त्याखालील पाईप लाईन लिकेज असतानाही त्यावर काँक्रीटीकरणाचे काम केल्यामुळे रस्त्यावर पाणी येत आहे. याची दाखल घेऊन संबंधित कंत्राटदारास योग्य त्या सूचना देऊन लिकेजचे काम पूर्ण करण्यास सांगावे.
तरी सार्वजनिक हित आणि आगामी सण लक्षात घेता, प्रशासनाने यावर तात्काळ कार्यवाही करून हे रस्ते युद्धपातळीवर नव्याने तयार करण्यात यावेत ही नम्र विनंती.
आपला नम्र,(महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके))अध्यक्ष
फलटण तालुका काँग्रेस, सदस्य
सातारा जिल्हा दिशा समिती,
यावेळी फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), फलटण नगर परिषदेचे नगरसेवक श्री.पंकज पवार, फलटण शहर अल्पसंख्याक अध्यक्ष श्री अल्ताफ पठाण, श्री मनोहर गायकवाड, श्री लक्ष्मण तात्या शिंदे,श्री.मंजेखान मेटकरी व श्री.गंगाराम रणदिवे उपस्थित होते.*








