शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात २२ सप्टेंबर रोजी महाविद्यालयस्तरीय आविष्कार स्पर्धा!
सुमारे १४० प्रकल्पांचे सादरीकरण; २५० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार!
शिरूर प्रतिनिधी : शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरूर, पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली *महाविद्यालयस्तरीय आविष्कार स्पर्धा २०२६–२७* मंगळवार, *दि. २२ सप्टेंबर २०२६* रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे *अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते* भूषविणार असून *सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या Humanities विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई* प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, नवोपक्रमाची भावना आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून *सुमारे १४० संशोधनात्मक व नाविन्यपूर्ण प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. या प्रकल्पांच्या सादरीकरणासाठी २५० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.*
स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विविध शाखांतील विद्यार्थी सहभागी होणार असून *विज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, कृषी व पशुसंवर्धन, वैद्यकीय व औषधनिर्माण, मानविकी तसेच अभियांत्रिकी व तंत्रज्ञान* अशा विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना संशोधनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रकल्पात विकसित करून तज्ज्ञ परीक्षकांसमोर मांडण्याची संधी या स्पर्धेतून मिळणार आहे.
आविष्कार मार्गदर्शन कार्यशाळेत प्राचार्यांचे मार्गदर्शन
महाविद्यालयात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या *आविष्कार मार्गदर्शन कार्यशाळेत प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.* प्रकल्पाची संकल्पना कशी असावी, प्रकल्पामध्ये नाविन्यपूर्णता व उपयुक्तता कशी दाखवावी, संशोधनाची मांडणी कशी करावी, *पोस्टर प्रभावी पद्धतीने कसे तयार करावे तसेच प्रकल्पाचे सादरीकरण तज्ज्ञ परीक्षकांसमोर आत्मविश्वासाने कसे करावे*, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांकडे केवळ प्रकल्प म्हणून न पाहता त्यामागील संशोधनात्मक दृष्टिकोन आणि समाजोपयोगी परिणाम स्पष्ट करण्याचा प्रयत्न करावा, असे मार्गदर्शनही करण्यात आले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना आविष्कार स्पर्धेच्या स्वरूपाची, मूल्यांकनाच्या निकषांची आणि प्रभावी प्रकल्प सादरीकरणाची दिशा मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेविषयी उत्साह निर्माण झाला असून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांची नोंदणी केली आहे.
स्पर्धेतील प्रकल्पांचे *तज्ज्ञ परीक्षकांकडून परीक्षण* करण्यात येणार असून प्रकल्पांची नाविन्यपूर्णता, उपयुक्तता, वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची गुणवत्ता, समस्या निराकरणाची क्षमता आणि सादरीकरण यांसारख्या विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे. उत्कृष्ट प्रकल्पांची पुढील स्तरावरील आविष्कार स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी *प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली*, *उपप्राचार्य प्रा. एच. एस. जाधव* आणि *संशोधन समन्वयक डॉ. सुनील भोईटे* यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. *आविष्कार समन्वयक डॉ. योगेश सेठी* यांच्या समन्वयातून विविध समित्यांचे गठन करून स्पर्धेची पूर्वतयारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, प्रकल्प मार्गदर्शक, तज्ज्ञ परीक्षक, स्वयंसेवक विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक आणि नाविन्यपूर्ण क्षमतेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा महाविद्यालयातील *संशोधन, नवोपक्रम आणि सर्जनशीलतेच्या संस्कृतीला चालना देणारी ठरणार आहे. सुमारे १४० प्रकल्प आणि २५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग हे यंदाच्या आविष्कार स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरणार आहे.*








