शिरूर येथील बोरा महाविद्यालयात “उच्च शिक्षण आणि शाश्वत विकास” विषयावर 13 व 14 मार्चला दोन दिवसीय’ राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
शिरूर: येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उच्च शिक्षण आणि शाश्वत विकास’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र दिनांक १३ व १४ मार्च २०२६ रोजी महाविद्यालयात संपन्न होणार आहे.
या राष्ट्रीय चर्चासत्रात देशभरातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक, औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या चर्चासत्रामध्ये भारतातील ‘उच्च शिक्षण आणि शाश्वत विकास’ यांमधील परस्परसंबंधांवर सखोल विचारमंथन करण्यात येणार आहे.
चर्चासत्रातील विविध तांत्रिक सत्रांमध्ये मुख्य विषयाशी संबंधित संशोधन निबंध सादर केले जाणार आहेत. तसेच विशेष आमंत्रित मान्यवरांची व्याख्यानेही आयोजित करण्यात आलेली आहेत. यामध्ये आंध्रप्रदेशातील विक्रमा सिम्हापुरी विद्यापीठ नेल्लोर चे कुलगुरू डॉ. श्रीनिवासा राव, माजी कुलगुरू प्रा. डॉ. पंडित विद्यासागर, मध्यप्रदेशातील मदन मोहन मालवीय टीचर ट्रेनिंग सेंटर, एच. एस. गौर विद्यापीठ सागर चे संचालक डॉ. आर. टी. बेद्रे, माजी कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उप-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, संगणक तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, अधिष्ठाता डॉ. विजय खरे, व छत्रपती संभाजीनगर येथील एम.आय.टी. चे संचालक डॉ. भालचंद्र वायकर विशेष मार्गदर्शन करणार आहेत. या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये उच्च शिक्षणातील शाश्वत विकासाशी संबंधित विविध अभ्यासक्रम, कृत्रिम बुद्धिमत्ता, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील कौशल्यविकासावर भर, संशोधन व नवोपक्रमांचा वापर, रोजगाराच्या संधी आणि उद्योजकता या विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने तसेच शोधनिबंध सादर केले जाणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) प्रभावीपणे राबविण्यासाठी या परिषदेतील सादरीकरणाचा मोलाचा हातभार लागेल, असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी व्यक्त केला आहे.
विविध महाविद्यालये, विद्यापीठे तसेच परराज्यातील प्राध्यापक व संशोधकांनी या राष्ट्रीय चर्चासत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.सुनील भोईटे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.









