जेष्ठ नागरिक संघ फलटण यांच्या वतीने आदर्श माता, आदर्श पिता आणि तेजस्विनी पुरस्कारांचे वितरण
फलटण: आज समाजामध्ये सर्वत्र धावपळीचे, दगदगीचे व सतत कामाच्या धांदलीचे, गडबडीचे वातावरण दिसून येते.लोकांना स्वतःच्या आयुष्यातील उद्दीष्टांच्या पुर्ततेसाठी नियमितपणे जीवनाशी तडजोड करावी लागते. जीवनासमोर दैनंदिन आव्हानांचा सामना करत परिस्थितीशी दररोज दोन हात करत आयुष्य सावरावे लागत आहे. असे असताना समाजामध्ये कित्येक चांगले कार्य करणारी व चांगल्या कर्तुत्वाचा गौरव करणाऱ्या कित्येक संस्था, संघटना देखील आहेत. अशाच फलटण एका जेष्ठ नागरिक संघटनेने नुकताच समाजामध्ये कित्येक अडचणींना सामोरे जाऊन स्वतःमधील खंबीरपणा धैर्य दाखवून अडचणीवर मात करून आपुलकीने आपल्या जीवनाला सावरत इतरांचे जीवन देखील कसे आनंदी होईल, आपल्यावर आलेल्या परिस्थितीमुळे हार न मानता आपल्यातील चांगल्या क्षमतांचा समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी व एकूणच जनहितासाठी उपयोग झाला पाहिजे अशा उदात्त माता, पिता व संघर्षातून स्वतःला घडविणाऱ्या तेजस्विनी स्त्रीचा आदर करत त्यांना इतरांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून जगासमोर मांडण्याचा स्तुत्य उपक्रम जेष्ठ नागरिक संघ, फलटण यांनी केला आहे.
समाजातील अशा कर्तृत्ववान मंडळींचा सन्मान सौ.संध्या गायकवाड व्यवस्थापकीय संचालिका, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी आदर्श माता श्रीमती ज्योती देविदास रिठे,आदर्श पिता कुमार नामदेव जाधव यांना तर तेजस्विनी पुरस्कार हा मा. सौ. सुप्रिया क्षीरसागर दुधेबावी यांना प्रदान करण्यात आला.
खूप आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सत्कार व सन्मान झाला, या सर्वांचा परिचय व त्यांचे कार्य अर्जुन रूपनवर सर यांनी सांगितले तर दरवर्षी प्रत्येक महिन्यामध्ये वेगळे उपक्रम घेऊन जेष्ठ नागरिक संघ, फलटण सतत नवनवीन उल्लेखनीय कार्य करत असतो व यासाठी समाजातील कित्येक लोक वर्गणी / देणगी देतात. त्यामुळेच आम्ही हे कार्यक्रम घेऊ शकतो असे प्रतिपादन रविंद्र येवले सर यांनी त्यांच्या प्रास्ताविकमध्ये केले. तसेच आपल्या अध्यक्षीय मनोगतात सौ. संध्या गायकवाड यांनी या सर्व आदर्श व्यक्तिमत्त्वांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या तसेच जेष्ठ नागरिक संघाच्या गौरवास्पद कामगिरीचे देखील मनापासून कौतुक केले. याशिवाय कुणीही व्यक्ती स्वतःच्या तत्वांशीवाय चांगले कार्य करू शकत नाही. प्रत्येकाने स्वतःला घडवताना स्वतःची प्रेरणा बनत संयमाने, धैर्याने, न डगमगता परिस्थितीशी झुंज दिली तर नक्कीच प्रत्येक समस्येवर मार्ग निघतो व सकारात्मक दृष्टीकोन माणसाला आनंदी जीवनाकडे घेऊन जातो, असे सांगितले.
मा. हिरामण गांधी, अध्यक्ष जेष्ठ नागरिक संघ, फलटण, अर्जुन रुपनवर, रविंद्र येवले, शरद इनामदार, विक्रम आपटे, माधुरी दाणी इ. जेष्ठ नागरिक संघ फलटणच्या सदस्यांनी हा उपक्रम राबवला.
अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी परिसरातील जेष्ठ मंडळी, तसेच सर्व पुरस्कारार्थीचे नातेवाईक, कुटुंबीय व मित्रपरिवार उपस्थित होते.









