समाजकारण आणि राजकारणातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे राजाळे गावचे माजी सरपंच श्री.मोहन सुतार होत. आज त्यांचा 63 वा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.
राजाळे गावचे माजी सरपंच मोहन सुतार यांच्या सामाजिक व राजकीय जीवनाची सुरुवात ही संघर्षामधून झालेली दिसून येते.त्यांच्या जन्म दिनांक 15 जून 1964 रोजी झाला. वडील यांचा पारंपरिक व्यवसाय हा सुतारकाम होता. त्यांना एकूण पाच भावंड व एक बहीण असून त्यांना प्रतिकूल परिस्थितीतही वडिलांनी सर्व मुलांना शिक्षण दिले व त्याचप्रमाणे पिढीजात व्यवसायात पारंगत केले. आई कृष्णाबाईने मुलांवर त सुसंस्कार घडवण्याचे काम करून अत्यंत कष्टाने सर्वांचे पालन पोषण केले.
*रसिक कला मंचच्या माध्यमातून सामाजिक सेवेची सुरुवात* – राजाळे गावातील व शालेय जीवनातील मित्रांनी पुढे आपल्या गावातील तरुण युवकांना व समाजातील सुज्ञ नागरिकांना थोर विचारवंतांचे मार्गदर्शन लाभावे. व राजकारण विरहित समाजसेवेचे व्रत अचानक यावे यासाठी स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे नियोजन करण्यासाठी’ रसिक कला व क्रीडा मंच’ या नावाने एक सेवाभावी तरुण मंडळाची स्थापना केली. त्यामध्ये मोहन सुतार हे एक संस्थापक सदस्य होते. यावेळी या तरुण मंडळामध्ये प्रा. निळकंठ निंबाळकर सर, डॉ. मारुती जाधव, संदिप (दादा)पवार, डॉ. दत्तात्रय तोरसे, फत्तेसिंग घाडगे, लक्ष्मण महिपाल, ॲड.सलीम शेख, मारुती तात्या मोहिते, दीपक निंबाळकर राहुल शेडगे, उदयसिंह निंबाळकर, सह अनेक तरुण यामध्ये सहभागी होते. मोहन सुतारांनी यामध्ये अध्यक्ष म्हणून खूप मोठी जबाबदारी पार पाडली. गावामध्ये समाज प्रबोधन चळवळ उभी राहिली.
*राजाळे गावचे सरपंच म्हणून 5 वर्ष यशस्वी कारकीर्द (26/08/2000 ते 25/08/2005* – त्यावेळी गावची निवडणूक ही बिनविरोध झाली होती. दोन्ही गटाकडून सरपंच पदासाठी एक मताने बिनविरोध सरपंच पदी श्री.मोहन सुतार यांची निवड करण्यात आली होती. यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माननीय श्री.विश्वासराव भोसले साहेब यांनी मोहन सुतार यांचे गावासाठी काहीतरी चांगले काम कार्य करण्याची सेवाभावी वृत्ती, धडपड , सु-स्वभाव पाहून गावातील एका अल्पसंख्यांक बहुजन समाजातील सुतार कुटुंबातील एका तरुण नेतृत्वाला गावच्या सरपंच पदी काम करण्याची संधी दिली होती. त्या संधीचे सोने करण्याचे काम मोहन सुतार यांनी केले. गटनेते श्री विश्वासराव भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध लोकोपयोगी ,समाज उपयोगी कामे केले.आपल्या कर्तुत्वाने लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला.त्यामध्ये गावच्या पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी पिंप्रद पासून राजाळे येथे पाणी योजना पूर्णत्वाला आणली. जिल्हा परिषद केंद्र शाळा राजळे येथील शाळेची दुरुस्ती, शाळेवरती नवीन पत्रे बसवणे, गोरगरिबांसाठी हातपंप बसवणे, गावातील सांडपाण्याची व्यवस्था, वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन करणे, गावचे एलआयसी प्रतिनिधी श्रीराम भाऊ निंबाळकर यांच्यासोबत गावातील नागरिकांचे शंभर आयुर्विमा घेऊन गावाला पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक मिळवून दिले. व त्यातून गावासाठी लोखंडी स्वागत कमान उभारली. ती आजही सुस्थितीत आहे. त्याचप्रमाणे गावात अनेक गणेश मंडळ होते. त्या सर्वांचे एकत्रीकरण करून गावामध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम सुरू केला. तो आजही सुरू आहे. एक गाव एक गणपतीच्या माध्यमातून गणेशोत्सवामध्ये गावातील स्थानिक कलाकारांना सोबत समाज प्रबोधनपर नाटके केली. यामध्ये स्वतः सरपंचांनी कलाकाराची भूमिका बजावली होती. अंधश्रद्धा निर्मूलनपर नाटके, स्त्रीभ्रूणहत्या वर नाटके, केली होती. मंडळाच्या या सामाजिक उपक्रमामुळे फलटण तालुक्यात त्यावेळी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले होते.
असे अनेक गावांमध्ये सामाजिक उपक्रम राबवणारे, गावातील सर्व गटा तटातील लोकांना सोबत घेऊन जाणारे, गावातील सर्वसामान्य नागरिकांशी नाळ जोडलेले, सर्व समावेशक ,अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले राजाळे गावचे माजी सरपंच श्री. मोहन महादेव सुतार यांना 63 व्या वाढदिवसाच्या निमित्त समस्त राजाळे ग्रामस्थांकडून हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. त्यांना उदंड, आरोग्यपूर्ण आयुष्य लाभावे. हीच आई जानाई चरणी प्रार्थना …….
लेखक – डॉ. दत्तात्रय तोरसे,सामाजिक कार्यकर्ते राजाळे ता. फलटण









