पुण्यातील गिरिप्रेमी ग्रुपचा पन्हाळा-पावनखिंडचा प्रेरणादायी-साहसी ट्रेक संपन्न!
५२ किलोमीटर अंतराचा पन्हाळा ते पावनखिंड हा सह्याद्रीच्या डोंगरातील चित्तथरारक ट्रेक!
कोल्हापूर : पन्हाळा गडाला वेढा घालून बसलेल्या सिद्दीच्या सुमारे ६० हजार फौजेची कोंडी फोडून छत्रपती शिवाजी महाराज धोधो कोसळणाऱ्या पावसात निसटून राजदिंडी, मसाई पठार, करपेवाडी, पांढरपाणी, पावनखिंडमार्गे विशाळगडावर पोहोचले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत सुमारे सहाशे निवडक सहकारी होते. शत्रू पाठीशी असताना त्यांचे धैर्य, शौर्य आणि वेगवान हालचाली ही जागतिक घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सहकाऱ्यांना घेऊन ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने पावसाळ्यात या मार्गाने जाण्याची परंपरा आहे. वरून धो धो कोसळणारा पाऊस, लाल मातीचा चिखल, भरून वाहणारे ओढे, घनदाट जंगल, सह्याद्रीचे चढ-उतार ओलांडत पांढऱपाणी वरून पावनखिंडीत जाऊन बांदल फौजेतील सैनिक बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, शंभुसिंह जाधव इत्यादी शूरवीरांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी सर्व शिवप्रेमी आतुर झालेले असतात.
आम्ही गिरीप्रेमी पन्हाळा पावनगड ६७ व्या ट्रेकसाठी रविदादा ढमढेरे, पी. एन. पाटील सर, चंद्रकांत पाटील, बाळासाहेब बेंद्रे इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ३१ जुलै रोजी रात्री ८ वाजता पन्हाळगडावर मुक्कामी पोहोचलो. दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन करून ट्रेकला सुरुवात केली. १ ऑगस्टला साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही अभिवादन केले. याप्रसंगी पन्हाळा नगरपालिकेचे उपनगराध्य चेतन भोसले, नेते राजीव सोरटे, शरीफ नगारजी यांनी उपस्थित राहून ट्रेकला शुभेच्छा दिल्या.
दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता ट्रेकला सुरुवात झाली. दोन दिवसात सुमारे ५२ किलोमीटरचे सह्याद्रीतून अंतर कापून पुढे जाण्यासाठी आम्ही मार्गस्थ झालो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात १८० गिरिप्रेमी सहभागी झाले होते. त्यामध्ये तीस महिला, बारा लहान मुले यांचाही समावेश होता. यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचा खापर पणतू शाहुराज आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा येथून आलेले ८० वर्षाचे प्रा. प्रल्हाद जोगदंड सर यांचा समावेश होता. राजदिंडी मार्गाने आम्ही तुरुकवाडीत उतरलो, तेथून म्हाळुंगे पार करून मसाई पठारावर प्रवेश केला. मसाई पठार प्रचंड विस्तीर्ण पठार आहे. पठारावर मसाई देवीचे मंदिर आहे. सर्वांनी मसाई देवीचे दर्शन घेतले. मसाई पठारावरील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे पाण्याचा उलटा धबधबा आहे. सुमारे आठ किलोमीटरचे मसाई पठार पार करून आम्ही कुंभारगावात उतरलो. तेथेच दुपारचे जेवण घेतले. जेवण झाल्यावर लगेच पुढील प्रवासाला सुरुवात झाली. पावसाची रिमझिम, लाल मातीचा चिखल तुडवत शिवरायांचा जयघोष करत आम्ही खोतवाडी, मांगलाईवाडीचा डोंगर पार करून सायंकाळी ६ वाजता करपेवाडी येथे मुक्कामी पोहोचलो. अनेक ट्रेकर ग्रुप येथे मुक्कामी असतात. महिलांची व्यवस्था संजय साळोखे यांच्या घरी करण्यात आली तर मोठ्या संख्येने म्हणजे हजारो शिवप्रेमींसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खासदार फंडातून या मार्गावर अनेक हॉल बांधून दिले आहेत. त्या हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली. कोल्हापूरचे पत्रकार व ट्रेकर्स ग्रुपचे प्रमुख प्रशांत साळुंके यांच्या पाठपुराव्यामुळे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवप्रेमींसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
करपेवाडीतील हॉलमध्ये आम्ही जेवण केले. संजय साळोखे यांनी जेवणाची व्यवस्था केली होती. येथील सभागृहात नवीन सभासदांची ओळख व ट्रेकबाबत दिशादर्शक मार्गदर्शन करण्यात आले. रात्री लवकर झोपून दुसऱ्या दिवशी म्हणजे २ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता ट्रेकला सुरुवात झाली. आंबेवाडी , कळकेवाडी, रिंगेवाडी, माळेवाडी, पाटेवाडी, धनगरवाडी, म्हसवडे आणि पांढरपाणीच्या जंगलातून धोधो पडणारा पाऊस झेलत अनेक ओढे पार करून आम्ही पांढरपाणी येथे दुपारच्या जेवणासाठी पोहोचलो. तेथे सरूडचे लालासाहेब नाईक भेटण्यासाठी आले होते. पांढऱपाणी गावात छत्रपती शिवाजी महाराजांनी गावकऱ्यांसाठी बांधून दिलेली ऐतिहासिक विहीर पाहिली. तेथून चार किलोमीटर अंतरावरील पावनखिंडीत आम्ही पोहोचलो. सुमारे ५२ किलोमीटर अंतराचा पन्हाळा ते पावनखिंड हा सह्याद्रीच्या डोंगरातील चित्तथरारक ट्रेक सर्वांनी आनंदाने पूर्ण केला. या ट्रेकमध्ये लहान मुलं, महिला, शेतकरी, शिक्षक, उद्योजक आणि अधिकारी मोठ्या उत्साहाने दोन दिवस अथकपणे चालत होते. पावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांडे आणि इतर मावळ्यांच्या स्मारकाला अभिवादन करून गिरिप्रेमी ग्रुपच्या ६७ व्या ट्रेकची सांगता झाली.
पन्हाळा ते पावनखिंड हा ट्रेक इतका साहसी, प्रेरणादायी आहे की त्याचे वर्णन शब्दात करता येणार नाही. सह्याद्री केवळ सुंदर नाही तर तो शूर आहे. तो पराक्रमी आहे. हा केवळ दगड धोंड्यांचा उंच पर्वत नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शौर्याचा, धैर्याचा, त्यागाचा आणि समर्पणाचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे मावळ्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली, त्याप्रमाणेच निर्जीव सह्याद्रीला देखील मोगल-आदिलशहाच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. त्या सह्याद्रीतील पन्हाळा-पावनखिंड हा ट्रेक आयुष्यात एकदा तरी नक्कीच करायला पाहिजे.
डॉ .श्रीमंत कोकाटे








