फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर पैकी गरजू किती? खरे लाभार्थी अजूनही वंचितच?
साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री.संतोष पाटील यांना निवेदन; घरकुल पडताळणी करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांची होणार चौकशी!जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकरणाची गंभीर दखल!
“घरकुले लुटणारे गाव टगे”: भाग-5
फलटण: फलटण तालुक्यामध्ये 131 ग्रामपंचायती असून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 2.0 मध्ये एकूण 8,900 लोकांना घरकुले मंजूर झालेली आहेत. पैकी यातील खरे लाभार्थी शोधले असता 2 हजार सुध्दा आकडा गाठता येणार नाही. तरी यातील अनेक लोकांना प्रत्यक्ष पाहणी केली असता पक्की घरे असल्याचे दिसून येत आहेत.
या शासनाच्या योजनेमध्ये गावठग्यांकडून गावचे धनधांडगे लोक यांना घरकुलांची खिरापत वाटलेली दिसून येत आहे. गावगाड्यातील सत्ताधारी लोकांना हाताशी धरून आपली नावे बसवली असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.यांना आता रोखले नाही तर हे घरकुले लुटणारे गावटगे यांची टोळी वाढतच जाईल.
तर दुसरीकडे गावगाड्यातील बेघर लोक, दुसऱ्यांच्या घरात भाड्याने राहणारे लोक,पक्की घरी नसलेले लोक आजही या योजनेपासून वंचितच असल्याचे दिसून येत आहे.
ज्यावेळी घरकुलांच्या नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्ष पडताळणी वेळी फलटण पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांनी गावोगावी जाऊन लोकांची पाहणी केली. यामध्ये त्यांना अनेक लोक हे बोगस असल्याचे दिसले. परंतु यावर आर्थिक सेटलमेंट झाली. फलटण तालुक्यातील गावगाड्यातील या बोगस लाभार्थ्यांकडून घरकुले बसवण्यासाठी प्रत्येकी हा पाच हजार रुपयांचा मलिदा यांच्याकडून घेण्यात आला असल्याचे समोर येत आहे.
या जर अशा गोष्टी असतील तर प्रशासनामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होऊन घरकुल लुटारूंना साथ दिली जात आहे. सरकारी निधी पद्धतशीरपणे लुटला जात आहे. यावर कोणाचा अंकुश असणार आहे.
या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून Ap न्यूजचे संपादक प्रा.अमोल पवार यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री.संतोष पाटील यांना याबाबत निवेदन दिले आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करून जे अधिकारी व कर्मचारी यांना घरकुल पडताळणी गावागावात जाऊन करत होते. त्यांच्याकडून जे बोगस लाभार्थी घरकुलासाठी पात्र करण्यात आले आहेत. याबद्दल त्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावर जिल्हाधिकारी यांनी सर्व बाजू ऐकून घेऊन सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्याकडे प्रकरणाची माहिती घेऊन त्यांना सदर बाबी निदर्शनास आणून देऊ असे सांगितले आहे.
यावर आता सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन मॅडम या काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. अन्यथा घरकुलांचे लुटेरे योजना लुटायला बसलेले आहेतच.
क्रमशः.. भाग:5








