तावडी गावात राधा गायीच्या डोहाळ्याचा कार्यक्रम!
युवा शेतकरी आकाश निंबाळकर यांच्या गोधन प्रेमाचे सर्वत्र कौतुक
फलटण: सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तावडी गावचे प्रगतशील शेतकरी आकाश निंबाळकर यांनी आपल्या ‘स्वप्नपूर्ती राधा’ नावाच्या लाडक्या गाईचे डोहाळे जेवण अतिशय उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरे केले. या अनोख्या आणि कौतुकास्पद कार्यक्रमाची संपूर्ण परिसरात चर्चा रंगली आहे.
निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आणि आपल्या गोधनाची असणारी आपुलकी जोपासत, आकाश निंबाळकर यांनी आपल्या घरातील इतर सदस्यांप्रमाणेच गाईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमासाठी स्वप्नपूर्ती राधाला आकर्षक फुलांच्या माळा आणि पारंपरिक दागिन्यांनी अगदी नटवून सजवण्यात आले होते. परिसरातील महिलांनी एकत्र येत गाईची औक्षण केले, लाडाने पुरणपोळीसह विविध पक्वान्नांचा नैवेद्य खाऊ घातला आणि शेतात आनंदाचे वातावरण निर्माण केले.
एकंदरीत, मुक्या प्राण्यांवर अपार प्रेम कसे करावे आणि आधुनिक युगातही आपल्या संस्कृतीची व गोधनाची जोपासना कशी करावी, याचे उत्तम उदाहरण आकाश निंबाळकर यांनी या डोहाळे जेवणाच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवले आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाबद्दल तावडी आणि फलटण परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी गाईचे पुजन तावडी गावचे सुपुत्र ह.भ.प अक्षय महाराज कदम यांच्या हस्ते करण्यात आले.गणेश घनवट ,अतुल निंबाळकर, ओंकार शिंदे ,मनोज घनवट हे कार्यक्रमाला उपस्थित होते.








