फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा!
“मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा
फलटण : फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी गळीत हंगाम सन 2025 – 2026 मध्ये गाळप केलेल्या ऊसाला अद्याप दुसरा हप्ता मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना निवेदन देऊन शेवटचा इशारा दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर आणि फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव यांच्या नेतृत्वाखाली
१) श्रीराम सहकारी साखर कारखाना, फलटण
२) स्वराज ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड, उपळवे
३) शरयू ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड, कापशी
४) श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, साखरवाडी
या चारही कारखान्यांना दि. १०/०९/२०२६ रोजी निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांना आतापर्यंत फक्त 3२०० रु. प्रतिटन दर मिळाला आहे. गेल्या वर्षी कारखान्यांनी २०० रु. अतिरिक्त देण्याचे मान्य केले होते, परंतु साखरेचे दर वाढलेले असताना आणि कारखान्यांकडे हजारो क्विंटल साखर शिल्लक असताना ही वाढ अपुरी आहे. साखरेच्या वाढीव दराचा विचार करता आणखी ३०० रु. वाढ देणे गरजेचे आहे. त्यामुळे २०० + ३०० = ५०० रुपये प्रतिटन हा दुसरा हप्ता कारखाना सिझन सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, अशी ठोस मागणी संघटनेने केली आहे.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर म्हणाले, “मा. राजू शेट्टी साहेबांच्या आदेशानेच आम्ही हे आंदोलन उभे केले आहे. शेतकऱ्याच्या घामाचे दाम मिळालेच पाहिजेत. साखरेचे भाव वाढले, कारखानदारांनी कोट्यवधी कमावले पण शेतकरी मात्र वाऱ्यावर आहे. जर कारखाना सुरू होण्यापूर्वी ५०० रुपये जमा झाले नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणताही कारखाना सुरू होऊ देणार नाही. ऊस वाहतूक बंद, साखर उचल बंद आणि गेटवर ठिय्या आंदोलन केले जाईल. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी कारखानदार व प्रशासनाची राहील.” या निवेदनावर खालील स्वाक्षरी आहेत
*धनंजय महामुलकर, अध्यक्ष सातारा जिल्हा*
*नितीन यादव, अध्यक्ष फलटण तालुका*
*स्वाभिमानी शेतकरी संघटना*
प्रमोद गाडे
युवक राज्य प्रवक्ते
डॉक्टर रवींद्र घाडगे
किरण भोसले
विक्रम पवार
बाळासाहेब शिपुकले
अजित लाळगे








