मुधोजी महाविद्यालयाचे प्रा.प्रकाश शिंदे यांना भूगोल विषयातील संशोधनाबद्दल शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्रदान
फलटण : येथील मुधोजी महाविद्यालयाच्या भूगोल विभागातील प्रा. प्रकाश सोपानराव शिंदे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याकडून भूगोल विषयातील विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी “DROUGHT RISK ASSESSMENT USING GEOSPATIAL TECHNOLOGY OF THE YERLA RIVER BASIN, MAHARASHTRA” या विषयावर आपले संशोधन कार्य प्रा. डॉ. नामदेव वसंत तेलोरे, राजा श्रीपतराव भगवानराव महाविद्यालय, औंध (खटाव) यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. त्यांच्या संशोधनामध्ये येरळा नदी खोऱ्यातील दुष्काळाच्या जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी Remote Sensing, GIS, Geospatial Technology, Google Earth Engine, दुष्काळ निर्देशांक, जलवैज्ञानिक विश्लेषण आणि अवकाशीय तंत्रज्ञान यांचा प्रभावीपणे वापर करण्यात आला.
येरळा नदी खोरे हे महाराष्ट्रातील अर्धशुष्क प्रदेशातील महत्त्वाचे नदी खोरे असून, या परिसरात वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळाचा शेती, पाणी उपलब्धता, भूजल, पर्यावरण आणि ग्रामीण जीवनमानावर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर प्रा. शिंदे यांच्या संशोधनातून दुष्काळाची तीव्रता, अवकाशीय वितरण, दुष्काळ जोखीम क्षेत्रांचे निर्धारण तसेच जलसंधारण व भूजल व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे.
संशोधनामध्ये प्राप्त झालेले निष्कर्ष दुष्काळ व्यवस्थापन, जलसंधारण नियोजन, भूजल संवर्धन आणि शाश्वत जलस्रोत व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणारे आहेत. आधुनिक भू-अवकाशीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दुष्काळप्रवण क्षेत्रांचे अचूक मूल्यांकन करण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
प्रा. प्रकाश सोपानराव शिंदे यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. ना. श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर, माजी सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य; मा. श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर, सेक्रेटरी; तसेच, मा. श्रीमंत रघुनाथराजे विक्रमसिंह नाईक निंबाळकर चेअरमन यांनी अभिनंदन केले.
तसेच मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. पी.एच. कदम, प्राध्यापकवर्ग, भूगोल विभागातील सहकारी, विद्यार्थी व मित्रपरिवार यांनी प्रा. शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक, संशोधनात्मक आणि सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. शिंदे यांच्या या यशामुळे मुधोजी महाविद्यालय, फलटण तसेच भूगोल विभागाच्या शैक्षणिक व संशोधन परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.








