वसतिगृह हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे केंद्र बनावे : प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते.
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहात मा. प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थी जीवन, शिस्त, स्वयंशिस्त, व्यक्तिमत्त्व विकास आणि भविष्यातील वाटचाल याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वसतिगृहात राहण्यामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबन, शिस्त, सहकार्य, जबाबदारीची जाणीव आणि सामाजिक जीवनाचा अनुभव मिळतो. वसतिगृहातील स्वयंशिस्त ही विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलण्याची क्षमता ठेवते. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या भविष्यासाठी दूरदृष्टी ठेवून नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास करावा, असे आवाहन करतानाच महाविद्यालयाच्या ‘कमवा व शिका’ योजनेचे महत्त्व स्पष्ट केले. ‘कमवा व शिका’ योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेतच श्रमाचे महत्त्व अंगीकार करणे गरजेचे आहे. जगातील कुठलेच काम हे कमी दर्जाचे नसते. प्रत्येक कामामध्ये त्या कामाची स्वतःची प्रतिष्ठा सामावलेली असते. श्रमाचे महत्त्व समजलेला विद्यार्थी हा भविष्यातील एक जबाबदार नागरिक म्हणून पुढे येतो. तसेच आपण भविष्यात करणार असलेल्या प्रत्येक कामाचे मोल, मूल्य आणि महत्त्व यांचा संस्कार करणारी ही योजना असल्यामुळे वसतिगृहातील प्रत्येक विद्यार्थ्याने या योजनेत सहभागी होऊन स्वावलंबनाचा अनुभव घ्यावा, असेही ते पुढे म्हणाले. स्वतःचे विद्यार्थीदशेतील वसतिगृहातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर विशद करतानाच, वसतिगृहातील आवश्यक सोयी-सुविधांबाबत विद्यार्थ्यांनी मोकळेपणाने आपल्या सूचना व अडचणी मांडाव्यात. विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेऊन त्यावर योग्य तो विचार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वसतिगृहप्रमुख डॉ. सुनील भोईटे यांनी विद्यार्थ्यांना वसतिगृहाबाबत आपलेपणाची भावना निर्माण करण्याचे आवाहन केले. वसतिगृह हे आपलेच घर आहे, या भावनेतून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वच्छता, शिस्त आणि परिसराची काळजी घ्यावी. जसे आपण आपले घर स्वच्छ व सुंदर ठेवतो, त्याचप्रमाणे वसतिगृहही स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे त्यांनी सांगितले.
या मुक्त संवादामुळे विद्यार्थ्यांना आपल्या अडचणी, अपेक्षा आणि भविष्यातील उद्दिष्टांबाबत प्राचार्यांशी प्रत्यक्ष आणि थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. संवाद, शिस्त आणि स्वावलंबनातून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडविण्याचा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या मुक्तसंवादाचे प्रास्ताविक प्रा. वाघ सर यांनी केले तर आभार प्रा. अविनाश मेहेत्रे यांनी मानले.








