नेदरलँड देशात शिवजयंती उत्साहात साजरी.  जेष्ठ इतिहास अभ्यासक डॉ.श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान नेदरलँड देश आणि तेथील शिवजयंती! – डॉ.श्रीमंत कोकाटे


नेदरलँड देशात शिवजयंती उत्साहात साजरी.

जेष्ठ इतिहास अभ्यासक डॉ.श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान

नेदरलँड देश आणि तेथील शिवजयंती! – डॉ.श्रीमंत कोकाटे

 

नेदरलँड देश व येथून ::   छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचारमंचच्या वतीने दरवर्षी जगातील वेगवेगळ्या देशात शिवजयंती साजरी होते. यावर्षीच्या म्हणजे २०२६ च्या शिवजयंतीसाठी आयोजकांनी मला नेदरलँडला निमंत्रित केले होते. आयोजक नेदरलँड येथे राहणारे भारतीय विशेषतः महाराष्ट्रीयन आहेत. व्हिसा मिळवण्यापासून आयोजकांनी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले. शिवजयंतीचा कार्यक्रम निश्चित झाला. आयोजकांनी विमानाचे तिकीट पाठवले पण दरम्यान अमेरिका, इस्त्राएल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू झाले. संपूर्ण अरब देशांत युद्धाचा भडका उडाला, अनेक विमाने रद्द झाली, त्यामुळे मला वाटले आपलेही मुंबईवरून नेदरलँडची राजधानी ऍम्स्टरडॅमला जाणारे विमान रद्द झाले असेल. परंतु आयोजकांनी सांगितले की आपले विमान मुंबई- जेद्दाह-अ‍ॅम्स्टरडॅममार्गे असल्यामुळे ते कैरो , ग्रीक येथून येते. युद्धप्रवण परिस्थिती या मार्गावर नाही त्यामुळे हा मार्ग बंद नाही. मी मुंबईमार्गे दिनांक ४ मार्चच्या रात्री म्हणजे पाच मार्चच्या पहाटे अ‍ॅम्स्टरडॅमसाठी मुंबईच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन’ निघालो आणि पाच तारखेला दुपारी एक वाजता अम्स्टरडॅमच्या शिफोल विमानतळावर पोहोचलो. तेथे मला घेण्यासाठी इंजिनियर अमोल, रामेश्वर आणि प्रदीप आले होते. त्यांनी विमानतळावर नेदरलँडच्या जगप्रसिद्ध अशा ट्युलिपच्या फुलांचा गुच्छ देऊन माझे स्वागत केले. त्यांच्या गाडीत बसून आम्ही हेगच्या दिशेने निघालो. नेदरलँडचे रस्ते, शिस्त, घरांची रचना हे पाहत आणि आल्हाददायक थंडी याचा अनुभव घेत गप्पा मारत आमचा प्रवास रामेश्वर यांच्या घराकडे सुरू झाला.

 

नेदरलँड म्हणजे डच लोकांचा देश आहे. नेदरलँड याचा अर्थ ‘खालची जमीन’ म्हणजे समुद्रसपाटीपासून खाली असणारी देशभूमी. नेदरलँड्सची सुमारे चाळीस टक्के जमीन ही पूरप्रवण असून यापासून संरक्षण करण्यासाठी या देशाने डेल्टा प्रोजेक्ट राबवलेला आहे. म्हणजे त्यांनी समुद्रावर नियंत्रण मिळवून जमिनीचे व्यवस्थापन केले आहे. १९५३ साली नेदरलँडमध्ये मोठा पूर आला होता आणि त्यामध्ये हजारो लोक मरण पावले होते. त्यानंतर त्यांनी समुद्र अडविणारा र्‍हाईन नदीवर लोखंडी चलित बांध घातला व पाण्याचे व्यवस्थापन केले आहे. तेंव्हापासून नेदरलँडची जीवितहानी झाली नाही. त्यांनी समुद्रावर विजय मिळविला. आज जगातील सर्वात मोठे जलव्यवस्थापन नेदरलँडचे आहे. अनेक कॅनोल काढून त्याभोवती घरे उभारून प्रतिकूल परिस्थितीचे त्यांनी सौंदर्यात रूपांतर केले आहे. युरोपातील सर्वात मोठे रॉटरडॅम बंदर नेदरलँड मध्येच आहे. नेदरलँड हा देश युरोपातील पश्चिम समुद्रकिनार्‍यावर आहे. नेदरलँडची लोकसंख्या सुमारे दोन कोटी असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे ४१ हजार चौरस किलोमीटर आहे, म्हणजे भारतातील सुमारे केरळ राज्याएवढा नेदरलँड हा देश आहे. नेदरलँड हा कृषी उत्पादनात अग्रेसर देश आहे. नेदरलँड कृषी उत्पादन निर्यातीमध्ये जगातील क्रमांक दोनचा आहे तर अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. भारताचे क्षेत्रफळ सुमारे ३२ लाख चौरस किलोमीटर आहे, तर अमेरिकेचे क्षेत्रफळ भारताच्या तिप्पट म्हणजे सुमारे ९८ लाख चौरस किलोमीटर आहे. यावरून नेदरलँडच्या कर्तृत्वाची कल्पना येते. हा देश प्रामुख्याने फुले, दुग्धजन्य पदार्थ आणि भाजीपाला निर्यात करतो, तसेच बैंकिंग, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, रसायने, विमा, व्यापार आणि शिक्षण यामध्ये हा आघाडीवर आहे. येथील लोक शेतीमध्ये आणि उद्योग क्षेत्रात प्रचंड मेहनत करतात. शेती अर्थातच आधुनिक पद्धतीने केली जाते. येथे कोणीही बसून खात नाही. या देशात घामाला दाम आणि श्रमाला मोल आहे. मजूराला, कारागिराला, वेटरला उत्तम वेतन आहे त्यामुळे येथे आर्थिक आणि सामाजिक तफावत दिसत नाही. संपूर्ण देशात झोपडपट्टी किंवा दुय्यम दर्जांची घरे दिसली नाहीत. येथील सधन परिवारातील मुलेमुली देखील सुपरमार्केट, मॉल, हॉटेलमध्ये कॉलेजजीवनापासूनच काम करतात. या देशात श्रमाला प्रतिष्ठा आणि मोबदला आहे. शेतीमालाला भाव आहे. आपल्या देशातील बटाटा सुमारे २५ रुपये किलो तर नेदरलँडमधील बटाट्याला ३०० रुपये प्रति किलो भाव आहे, म्हणून तेथे महागाई आणि दर्जेदार जीवनमान आहे. आपल्या देशात मातीमोल भावाने शेतीमाल विकायचा आणि मजुरांना खूप कमी मजुरी दिली जाते, त्यामुळे गरीब गरीब होत चालला आहे आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे. नेदरलँडपेक्षा आपल्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती जास्त प्रमाणात आहे, तरीदेखील तेथे प्रगती झाली त्याप्रमाणात आपल्या देशात का झाली नाही. त्याचे कारण आहे इच्छाशक्ती आणि भ्रष्टाचार. नेदरलँड देशाची लोकसंख्या सुमारे दोन कोटी आहे आणि सायकली अडीच कोटी आहेत. तेथील कुलगुरू, कलेक्टरदेखील नियमित सायकल वापरतात. पंतप्रधान सायकलवर जातात. येथील लोक प्रचंड सायकलप्रेमी आहेत. त्यामुळे येथील लोकांमध्ये जाडजुडपणा दिसला नाही. येथे ढेरपोट्यांना प्रतिष्ठा नाही. आबालवृद्ध सर्वजण सायकल वापरतात. या देशात विविध रंगाची ट्युलिप फुले आहेत ज्यामुळे जगभरातील पर्यटक आकर्षित होतात. वीजनिर्मितीसाठी विंडमिल आणि सोलर पॅनलचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.

 

नेदरलँडमधील रस्ते खूप सुंदर आहेत. मी जवळ जवळ निम्मा देश पाहिला पण कोठेही रस्त्याला खड्डा दिसला नाही. आपल्याकडेही हे शक्य आहे पण तसे रस्ते का होत नाहीत तर प्रचंड भ्रष्टाचार. रस्ता एक कोटीचा असेल तर सुमारे ७० लाख रुपये सर्वजण मिळून खातात आणि एक दोन वर्षात रस्ता वाहून जाईल असे रस्ते करतात. आपला देश अपवाद वगळता भ्रष्टाचारी पुढार्‍यांनी आणि अधिकार्‍यांनी चाटून पुसून खाऊन टाकला आहे. नेदरलँडच्या कोणत्याही रस्त्यावर साधा कागदाचा तुकडा शोधून सापडला नाही. ते सार्वजनिक मालमत्तेला स्वतःच्या घराप्रमाणे जपतात, इतके ते राष्ट्रभक्त आहेत. आपल्या देशात आंदोलन किंवा मोर्चा निघाला की पहिला दगड एसटी बस, रेल्वे किंवा सार्वजनिक मालमत्तेवर असतो.

 

नेदरलँडचे लोक भेटेल त्याला स्मितहास्य देतात जनुकाय आपली जुनी ओळख आहे इतके ते सौजन्यशील आहेत. तेथे मानवी मूल्ये खूप जोपासली जातात. आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची ते खूप काळजी घेतात. मला तर दोन दिवस असे वाटले की या नगरात कोण राहते की नाही इतकी येथे नीरव शांतता असते. शेजारी जर संध्याकाळी कांही कार्यक्रम असेल तर शेजार्‍यांच्या घरी एक मोठे चॉकलेट पाठवून ‘सॉरी आज आमच्याकडे छोटा घरगुती कार्यक्रम आहे त्यामुळे सहकार्य असावे,’ अशी विनंती केली जाते, तरी शेजारी सुरू असलेल्या कार्यक्रमाचा अजिबात आवाज येत नाही, इतके ते मानवी मूल्ये जोपासतात. आपल्या देशात मात्र शेजार्‍यालाच काय नगराला, गावाला त्रास झाला पाहिजे असे घरगुती कार्यक्रम असतात जाब विचारायला गेले तर मुदडे पाडले गेले आहेत. नेदरलँडमध्ये स्वतःच्या लहान मुलांनादेखील मारायचा किंवा रागावायचा अधिकार नाही, जर कोणाची मुले घरी रडत असतील आणि हे जर पोलिसांना समजले तर पोलिस याबाबत येवून योग्य ती दखल घेतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर दफ्तर काठीला अडकवून घरी एक पार्टी दिली जाते, या पार्टीला मित्र, नातेवाईक येतात. येथील मुले लवकरच स्वतःच्या पायावर उभी राहतात. मिळेल ती नोकरी,व्यवसाय करतात. मनापासून काम, अभ्यास करतात, तेवढाच जीवनाचा आनंद घेतात. स्त्री, पुरुष, तृतीयपंथी असा कोणताही भेदभाव या देशात नाही. येथे कोणीही बुवा, बापूकडे जात नाही. कोणीही ज्योतिष, पंचांग, भविष्य पाहत नाही. ते स्वकर्तृत्वाने भविष्य घडवितात. युरोपातील लोकांच्या विकासाची अनेक कारणे आहेत त्यापैकी सर्वात मोठे कारण आहे बुद्धिप्रामाण्यवाद (रेशनलिझम)! येथे अंधश्रद्धा नाहीत. आपल्या देशात पूर्णत: रेशनलिझम आल्याशिवाय आपल्या देशाची प्रगती होणार नाही. या देशात मुबलक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आपल्या देशालाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुबलक अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे, परंतु ते नीट वापरायची अक्कल अजून आपल्या देशातील जनतेला आलेली नाही, गैरवापर करायची मात्र आलेली आहे.

 

पाच मार्च रोजी इंजि. रामेश्वर यांच्याकडे हेग जवळीच झोतरमीर येथे मुक्काम केला. रामेश्वर यांनी हेग आणि परिसर दाखवला. सहा तारखेला आम्ही मॉर्निंग वॉकला गेलो सुमारे दहा किलोमीटर चाललो. संपूर्ण शहर पायी फिरलो. झोतरमीर येथील एका चौकात गांधीजींचा पुतळा दिसला. तेथे आम्ही फोटो काढला. नगर एकदम चकाचक आहे. घरे अत्यंत सुंदर आहेत. पार्किंग सुविधा उत्तम आहे. कोणीही कोठेही गाडी पार्क करू शकत नाही. वाहतुकीचे नियम खूप कडक आणि शिस्तबद्ध आहेत. सायकल, पायी चालण्यासाठी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग आहेत. सिग्नलचे नियम खूप काटेकोर पाळले जातात. एखाद्या चौकात एकही वाहन नसेल तरी गाडी थांबते. सिग्नल मिळाल्यानंतरच ती गाडी पुढे जाते. येथे पादचारी आणि सायकलस्वारांचा खूप आदर केला जातो. प्रत्येक नगरात उत्तम स्पोर्ट क्लब आहेत. जेष्ठ नागरिकांसाठी फ्लॅट सिस्टमची घरे असतात. याला ओल्ड हाऊसेस म्हणतात. बाकी बंगलो असतात. येथे आई वडिलांची प्रॉपर्टी मुलांच्या नावे ट्रान्सफर होत नाही. त्यामुळे येथे मुलांना स्वतःची प्रॉपर्टी स्वतः कमवावी लागते. त्यामुळे मुलं आळशी, ऐतखाऊ निघत नाहीत. प्रत्येक पिढीला कष्ट करावे लागते. प्रॉपर्टी ट्रान्सफर होत नाही त्यामुळे आई बाप गोरगरिबांना लुटून म्हणजे भ्रष्टाचार करून सात पिढ्यांसाठी कमवून ठेऊन पुढच्या पिढ्या आळशी, निष्क्रिय, ऐतखाऊ बनवत नाहीत, पण आई वडील मुलांना दर्जेदार शिक्षण देतात. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करतात नंतर ते स्वतंत्र राहतात. आई वडील प्रॉपर्टी विकून ओल्ड हाऊसमध्ये जातात. जर प्रॉपर्टी विकून थोडेफार पैसे राहिले तर ते मुलामुलींसाठी समान वाटून देतात. ते जग फिरतात. जीवनाचा आनंद घेतात आणि देतात.

 

आम्ही नेदरलँडमधील एका गावाला आणि शेताला भेट दिली. गावातील घरे, शाळा अत्यंत नियोजनबद्ध आहेत. खेडेगावातदेखील वाहतुकीचे आणि पार्किंगचे नियम पाळले जातात. घरे अत्यंत प्रशस्त आहेत. रामेश्वर यांच्या परिचयाच्या शेतात आम्ही गेलो. तेथे रोबोटद्वारे शेती, गायीचा गोठा चालवला जातो. वेळेनुसार रोबोट चारा टाकतात. शेतकर्‍यांचे फार्म हाऊस आहेत. त्या फार्म हाऊसवर अंडी, कोंबड्या, दूध, पनीर, चीज, भाजीपाला विकत मिळतो. भाव ठरलेले असतात. भावात घासाघीस करता येत नाही. त्यामुळे तेथील शेतकरी बीएमडब्लू, मर्चिडीस गाडीत बसून प्रवास करतात. येथे अन्नात आणि दूधात भेसळ केली जात नाही. त्यामुळे तेथील लोकांचे आरोग्य उत्तम आहे. आपल्या देशात शेतकर्‍यांनी फुकटच दिले पाहिजे अशी मानसिकता असते. बळीराजा बळीराजा म्हणत व्यवस्थेने त्याला पार पाताळात घातले आहे. भामटे लोक अन्नात आणि दुधात भेसळ करून जनतेचे आरोग्य धोक्यात घालतात.

 

सहा तारखेला आम्ही रामेश्वर यांच्या घरी जेवण करूनच हेग शहर आणि तेथील महत्त्वाची ठिकाणे पाहण्यासाठी निघालो. रामेश्वर यांच्या कारने आम्ही हेग शहरात गेलो. गाडी पार्क केली. शहर पायी फिरायचे हा माझा आग्रह होता. कारण पायी फिरले की लोकजीवन चांगले समजते, असे माझे मत आहे. रामेश्वर यांनी प्रथमत नेदरलँडचे पार्लमेंट दाखवले. नेदरलँडची राजधानी जरी अ‍ॅम्स्टरडॅम असली तरी मुख्यालय मात्र हेग या शहरात आहे. त्यानंतर आम्ही हेग शहरातील बर्ड संग्रहालय पाहिले. त्यामध्ये अनेक बर्ड पेंटिंग आहेत. तसेच त्याच्या शेजारी असणारे मौरिटसुईज संग्रहालय पाहिले. त्यामध्ये १७ व्या शतकातील डच मोनालिसाचे जगप्रसिद्ध चित्र पाहिले. हे पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येतात. तेथील हॉटेलमध्ये आम्ही ब्लॅक कॉफी आणि पाणी घेतले. पाण्याची बॉटल चार यूरोला आणि कॉफी पाच युरोला होती. एक युरो म्हणजे भारतीय १०० रुपये होय. त्यानंतर आम्ही स्पिनोझा या तत्वज्ञाच्या घरी गेलो. सतराव्या शतकात स्पिनोझा नावाचा बुद्धिप्रामाण्यवादी तत्त्वज्ञ(फिलोसोफर) होऊन गेला. त्याने निसर्ग हाच ईश्वर मानला. त्याने वैचारिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. त्याने बुध्दिप्रामाण्यवादाचे महत्व सांगितले. त्याच्या तत्त्वज्ञानाचा आईन्स्टाईन, हेगेल आणि रसेल यांच्यावर प्रभाव हेाता. देकार्त, स्पिनोझा आणि लायब्निझ ही विवेकवादी (रॅशनल) तत्त्वज्ञांची मोठी परंपरा होऊन गेली आहे. त्या परंपरेतील स्पिनोझा हा हेगमधील आहे. त्याचा पुतळा आणि त्यामागे त्याचे घर हेगमधील एका चौकात आहे. तेथे एक तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक तेथील व्यवस्था पाहतात. त्यांनी अत्यंत मनापासून स्पिनोझाचे घर दाखवले. त्यांच्या खासगी वापरातील वस्तू दाखवल्या. त्यांची ग्रंथ संपदा दाखवली. आमची आस्थेने चौकशी केली. स्पिनोझाचे घर पाहून आम्ही पायी चालत हेग येथे असलेले आंतरराष्ट्रीय न्यायालय (International court ) पाहण्यासाठी निघालो. ते अंतर खूपच लांब असल्यामुळे आम्ही ट्रॉमने तेथे पोहोचलो. दोन राष्ट्रांमधील वाद सोडवण्यासाठी हे न्यायालय काम करते. न्यायालयात आत जाता आले नाही. प्रवेशद्वारावरुणच आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालय पाहिले. तेथे आपला संदेश लिहिण्याची सुविधा आहे. मी तेथे एक इंग्रजीत संदेश लिहिला ‘युद्ध हे मानवासाठी धोकादायक आहे.’ प्रवेशद्वारावर प्रत्येक देशाने एक दगड पाठवलेला आहे. त्या सर्व दगडांची एक शिवपिंडीच्या आकाराची वर्ल्ड पीस फ्लेम बनविण्यात आलेली आहे. ती कायम तेवत असते.

 

हेगचा समुद्रकिनारा पाहून आम्ही घराकडे निघालो. वाटेत मार्केटमधून रामेश्वर यांनी फिश घेतले. रात्री जेवण करून अर्धा तास पायी फेरफटका मारून आलो. रात्री घरातील तापमान सुमारे दहापर्यंत तर बाहेर सुमारे पाच ते सहापर्यंत असते. दिवसा घरातील सुमारे अठरापर्यंत तर बाहेरील सुमारे बारा पर्यंत असते. घरातील तापमान उबदार ठेवण्यासाठी फरशीखाली गरम पाण्याचे नळ असतात. थंडीपासून बचाव व्हावा यासाठी येथे थर्मल किंवा जॅकेट वापरतात.

 

सात मार्च रोजी रामेश्वर यांच्याबरोबर मॉर्निंग वॉकला गेलो. तेथील मेट्रो पाहिली. सुमारे पाच किलोमीटरचा फेरफटका मारून घरी पोहचलो. अकरा वाजता जेवण करून आम्ही हेग शहरातील स्पोर्ट क्लबला गेलो तेथे रामेश्वर आणि त्यांचा चिरंजीव विहान टेनिस खेळले. स्पोर्ट क्लब मध्ये खेळाच्या अत्याधुनिक सुविधा आहेत. तसेच नेदरलँड देश सर्व शालेय विद्यार्थ्यांना प्रतिमहिना १०० युरो देतो. दर्जेदार क्रीडा साहित्य पुरवले जाते. त्यामुळेच या छोट्या देशातील विद्यार्थी ऑलिम्पिकमध्ये अनेक मेडल मिळवतात.

 

दिनांक सात मार्च रोजी दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचारमंच नेदरलँडच्या वतीने हेग येथील डायलर हाऊस सभागृहात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. याप्रसंगी नेदरलँड देशातून शिवप्रेमी सहकुटुंब सहभागी झाले होते. मुलांनी शिवगीते, पोवाडे, शिवकालीन खेळ सादर केले. याप्रसंगी माझे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे वैश्विक महत्त्व’ या विषयावर व्याख्यान झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डच संबंध यावर प्रकाश टाकला. गौटियार स्काउटन, डे ग्राफ, अब्राहम लेफेबर इत्यादी शिवकालीन डच पर्यटक आणि अधिकारी यांनी शिवाजी महाराजांच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. शिवाजी महाराज आणि डच यांचे खूप चांगले संबंध होते. शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, धैर्याचा, औदार्याचा, नैतिकतेचा आणि राज्याभिषेकाचा त्यांनी मोठया मनाने गौरव केला आहे. शिवाजी महाराज हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे होते. त्यांनी अशक्य कार्य शक्य करून दाखवले. ते समतावादी, विवेकवादी, स्त्रियांचा सन्मान करणारे होते. त्यांची तुलना जगात कोणाशीही होऊ शकत नाही. असे विचार मी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंजि. अमोल कोचळे, इंजि. रामेश्वर कोहकडे, इंजि. तुफान बच्छाव, अमोल पिसाळ, प्रदीप लब्दे, संतोष सावंत, निलेश देशमुख आदींनी परिश्रम घेतले. शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी देशातील विविध भागातून विशेषतः हेग, अ‍ॅम्स्टरडॅम, रॉटरडॅम येथून शिवप्रेमी आले होते. तसेच डेल्फ्ट येथून गजेंद्रसिंह जाधवराव सहकुटुंब उपस्थित राहिले. स्पेनच्या बार्सिलोना येथून धीरेंद्र रंगारी खास शिवजयंतीसाठी हेग येथे आले होते. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर सुमारे दीड तास भाषण केले. त्यानंतर प्रश्नोत्तरे झाली. शिवचरित्राशी संबंधित अनेक प्रश्न विचारले गेले त्याची मी उत्तरे दिली. त्यानंतर सर्वांनी सहभोजन केले. नेदरलँड सारख्या देशात हॉल बुक करणे, सर्वांना निमंत्रण देणे, भारतातून प्रमुख पाहुणे बोलावणे, नियोजन करणे हे सर्व काम सोपे नाही, पण शिवप्रेमापोटी हे सर्वजण परदेशात राहून करतात. परदेशात गेले तरी ते शिवाजी महाराजांना विसरले नाहीत. मुलांनी तर खूपच छान भाषणे केली, पोवाडे म्हटले, लेझीम खेळले, उत्तम प्रश्न विचारले. हे सर्व प्रेरणादायी आणि आनंददायी होते. त्यांची शिवभक्ती पाहून मी भारावून गेलो. या कार्यक्रमात डेल्फ्ट विद्यापीठात पाणी व्यवस्थापन या विषयावर पीएच. डी. करणारे डॉ. सुमित मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पुण्याचे बाळासाहेब जेधे यांचे नातेवाईक गजेंद्रसिंह जाधवराव यांच्याकडे डेल्फ्ट येथे मुक्कामासाठी गेलो. त्यांनी नेदरलँड विशेषतः युरोपची खूप माहिती दिली. ते आंतरराष्ट्रीय वकील आहेत. त्यांचे चिरंजीव विश्वजीत जर्मनीमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांच्या मिसेस तेथील बँकेत नोकरी करतात.

 

आठ तारखेला मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर जाधवराव यांनी डेल्फ्ट शहराचा बराचसा भाग दाखवला. तेथील निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती दिली. घरातील सदस्य जर बाहेरगावी जाणार असेल तर तो लिखित स्वरूपात आपले मतदान करण्याचा अधिकार कुटुंबातील सदस्याला देतो. मतदान गुप्त आणि बलेट पेपरवर होते. दुपारी बारा वाजता जाधवराव यांच्या घरी जेवण केले. हेरिंग हा नेदरलँड येथील नॅशनल फिश बनविला होता. विशेषतः तो कच्चाच खातात. जेवणानंतर आम्ही खूप गप्पा मारल्या. तोपर्यंत अमोल आणि रामेश्वर दोघेही मला घेण्यासाठी आले. मी आणि रामेश्वर डेल्टा प्रोजेक्ट पाहण्यासाठी समुद्रकिनार्‍यावर गेलो तर अमोल मिटिंगची तयारी करण्यासाठी घरी गेले. रामेश्वर आणि मी डेल्टा प्रोजेक्ट पाहिला. हा जगातील समुद्राच्या पाण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तयार केलेला पहिला प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमुळे नेदरलँडची सुमारे चाळीस टक्के जमीन वाचली. लाखो लोकांचे प्राण वाचले आणि देशाच्या सौंदर्यात भर पडली. त्यांनी संकटाचे रुपांतर सौंदर्यात व विकासात केले. तो महत्वाकांक्षी प्रकल्प पाहून आम्ही थेट अमोल यांच्या घरी गेलो. त्यांनी घरीच निवडक मित्रांसोबत चर्चा आणि नाश्ता अशी व्यवस्था केली होती. आम्ही विविध विषयांवर चर्चा केली विशेषतः इतिहास, तत्त्वज्ञान आणि सामाजिक घडामोडी यावर सविस्तर चर्चा झाली. बार्सिलोनाचे रंगारी आवर्जून भेटायला आले होते. त्यांनी बार्सिलोना येथे येण्याचा खूप आग्रह केला. दुसर्‍या दिवशी पॅरिस, बेल्जियम आणि लक्समबर्ग या देशात जायचे नियोजन करून संध्याकाळी अमोल यांच्याकडे मुक्काम केला.

 

दिनांक ९ मार्च रोजी अमोल आणि मी अमोल यांच्या वाहनाने फ्रान्सची राजधानी पॅरिसकडे निघालो. हेग येथून पॅरिस सुमारे पाचशे किलोमीटर आहे. रस्ते अत्यंत सुंदर आहेत. शिस्त काटेकोरपणे पाळली जाते, त्यामुळे अपघाताचे प्रमाण अत्यल्प आहे, ट्रॅफिक जॅम नाही. वाटेत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले पण एकाही पेट्रोल पंपावर कर्मचारी दिसला नाही. आपण स्वतः ऑनलाइन पैसे द्यायचे आणि स्वतःच पेट्रोल भरायचे अशी तिथे पद्धत आहे. पाचशे किलोमीटरचे अंतर सुमारे चार तासात म्हणजे दुपारी एक वाजता आम्ही पॅरिस शहरातील आयफल टॉवर येथे पोहोचलो. आयफेल टॉवर हे युरोपातील औद्योगिक क्रांतीचे प्रतीक आहे. त्याची उंची सुमारे ३३० मीटर (१०८३ फुट) आहे. फ्रेंच क्रांतीला शंभर वर्षे पुर्ण झाल्यामुळे १८८९ साली गुस्ताव्ह आयफेल यांनी हा टॉवर उभारला. हे काम दोन वर्षे चालले होते. यासाठी सुमारे ७३०० टन लोखंड वापरण्यात आले आहे. ते पाहून आम्ही पॅरिस शहरात फेरफटका मारला. म्युझियम कामानिमित्त बंद असल्यामुळे पाहता आले नाही. अमोल यांनी प्रवासात युरोपची खूप माहिती सांगितली. आम्ही पॅरिसवरून नेदरलँडकडे निघालो. वाटेत बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे अमोल यांचे मित्र इंजी. प्रदीप बनसोड यांच्याकडे जेवणासाठी थांबायचे ठरले.

 

इंजी. प्रदीप हे टोयोटा या कंपनीत संशोधक म्हणून काम करतात. ते सुमारे दहा वर्षे जपानमध्ये होते. आता ते बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स जवळील एका गावात राहतात. त्यांना शिवजयंती कार्यक्रमासाठी हेगला येता आले नाही म्हणून त्यांनी आम्हाला ब्रुसेल्सला येण्याचा आग्रह केला. आम्ही रात्री १० वाजता ब्रुसेल्स जवळील त्यांच्या घरी पोहोचलो. ते सर्व कुटुंबीय आमची जेवणासाठी वाट पाहत होते. आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केले. जेवता जेवता बेल्जियम, तेथील इकॉनॉमी, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विषयावर चर्चा केली. त्यांनी आमचे खूप आदरातिथ्य केले. तेथून आम्ही ब्रुसेल्सला आलो. ब्रुसेल्स हे खूप सुंदर शहर आहे. येथे नाटोचे आणि युरोपियन युनियनचे मुख्यालय आहे. ते पाहून आम्ही नेदरलँडला पोहोचलो.

 

पॅरिस, हेग आणि अ‍ॅम्स्टरडॅम येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित कागदपत्रे आणि पेंटिंग पाहायची होती, त्यासाठी अमोल आणि रामेश्वर यांनी संबंधितांना खूप वेळा मेल केले. पण त्यांची वेळ मिळाली नाही. युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे बहुतेक विमाने रद्द झाली होती. पुढे लवकर विमान मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे जे विमान मिळाले त्या विमानाने परत येण्याचा निर्णय घेतला. पण कांही दिवसांनी अ‍ॅम्स्टरडॅम, हेग, पॅरिस, लिस्बन आणि लंडन येथे असलेल्या शिवचरित्र साधनांचा अभ्यास करण्यासाठी जाणार आहे. नेदरलँड येथील शिवजयंती समारंभाच्या आयोजकांचे खूप खूप आभार, अभिनंदन आणि पुढील कार्यास सदिच्छा !.*– डॉ.श्रीमंत कोकाटे*


संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!