टाकळवाडे येथे जमिनीच्या वादातून एकास मारहाण !
सख्खे भाऊ पक्के वैरी!
फलटण – शेतजमिनीच्या वहिवाटीच्या वादातून ऊस तोडणीच्या कारणावरून एका शेतकऱ्यावर टिकावाच्या दांड्याने व कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण झाल्याची घटना फलटण तालुक्यातील टाकळवाडे येथे घडली.
याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन आण्णा नाझीरकर वय 54, रा. टाकळवाडे, ता. फलटण यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांचा व भाऊ तात्याराम आण्णा नाझीरकर यांच्यात शेतजमिनीच्या वहिवाटीवरून वाद असून त्याबाबत न्यायालयात दिवाणी दावा प्रलंबित आहे.
दि. 21 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास तात्याराम नाझीरकर हे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार त्यांच्या शेतातील ऊस तोडत असल्याचे समजल्याने अर्जुन नाझीरकर शेतात गेले. त्यावेळी ऊस तोडू नका, असे सांगितल्यावर “हे शेत माझे आहे, मध्ये पडलास तर जीवे मारेन,” अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यानंतर दुपारी सुमारे 3.15 वाजता शेजारील ओढ्यात नेऊन ऊस कुटी मशीनने कुटला जात असताना पुन्हा जाब विचारल्याने संतोष तात्याराम नाझीरकर यांनी टिकावाच्या दांड्याने डोक्यावर मारहाण केली, तर तात्याराम नाझीरकर यांनी कुऱ्हाडीच्या तुंब्याने डाव्या हाताच्या कोपरावर व उजव्या हातावर वार केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. तसेच खाली पडल्यानंतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून व शिवीगाळ केल्याची तक्रार करण्यात आला आहे.
जमिनीच्या वादातून दोन सख्या भावात धुसफूस चालू असून यामुळे दोन सख्खे भाऊ पक्के वैरी झाले असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे एकमेकांचे जीवावर बेतत आहे.
तात्याराम नाझीरकर व संतोष तात्याराम नाझीरकर या पिता पुत्रांवर गुन्हा दाखल झाला असून
पुढील तपास पोलिस सागर अभंग करत आहेत.









