डॉ. संजय ढोले यांच्या विज्ञानसाहित्याचा अभ्यास या विषयावर ज्योत्स्ना खंडागळे यांना पीएच. डी.
पुणे प्रतिनिधी :(प्रा. रोहिदास खेडकर):
डॉ. संजय ढोले यांच्या विज्ञानसाहित्याचा अभ्यास या विषयावर संशोधन प्रबंध सादर करून ज्योत्स्ना खंडागळे यांनी यशस्वीरीत्या पीएच. डी. पदवी संपादन केली आहे. त्यांचा हा संशोधन प्रबंध मराठी विज्ञानसाहित्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
या संशोधनासाठी त्यांनी डॉ. संजय ढोले यांच्या विज्ञानकथा, विज्ञानकादंबऱ्या तसेच त्यांच्या एकूण साहित्यिक योगदानाचा सखोल अभ्यास केला आहे. मराठी विज्ञानसाहित्याच्या प्रवाहात डॉ. संजय ढोले यांच्या लेखनाचे स्थान, त्यांच्या लेखनातील वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक भान आणि वाचकांमध्ये विज्ञानविषयक जाणीव निर्माण करण्यातील योगदान या बाबींचे विश्लेषण या प्रबंधात करण्यात आले आहे.
या संशोधन कार्यासाठी त्यांना आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे मौखिक परीक्षेनंतर पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या संशोधनासाठी प्रा. डॉ. मनोहर जाधव यांनी मार्गदर्शक तर प्रा. डॉ. प्रभाकर देसाई यांनी सह-मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. या मौखिक परीक्षेसाठी बहि:स्थ परीक्षक म्हणून जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या माजी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सिंधू भंगाळे उपस्थित होत्या तर मौखिकीचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे होते. या मौखिक परीक्षेसाठी प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक डॉ. संजय ढोले, प्रसिद्ध अभिनेते डॉ. मिलिंद शिंदे, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, प्रा. डॉ. सिद्धार्थ लांडे आदि प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठीतील अभ्यासक आणि सहकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
ज्योत्स्ना खंडागळे यांच्या या यशामुळे मराठी विज्ञानसाहित्याच्या अभ्यासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास साहित्यिक व शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.









