जीएसटी व टॅक्स कन्सल्टन्सी कौशल्यातून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
- फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
फलटण प्रतिनिधी:( दि. 15 डिसेंबर 2025:)
मुधोजी महाविद्यालय फलटण येथील वाणिज्य विद्या शाखा व चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने “आर्थिक शिस्त, कर व्यवस्था आणि व्यवसायामधील लेखापालाची निर्णायक भूमिका”
या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, कॉमर्सच्या पदवीबरोबरच विद्यार्थ्यांनी जीएसटी व इतर करविषयक व्यवहारांचे व्यावसायिक ज्ञान आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा कौशल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या प्रभावी संधी उपलब्ध होऊ शकतात.
आज प्रत्येक लहान–मोठ्या व्यावसायिक, उद्योजक व कंपन्यांना कर सल्लागारांची आवश्यकता असून,
विद्यार्थ्यांना शॉर्ट टर्म कोर्सेसच्या माध्यमातून कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. शिक्षकांनी शिकवलेल्या मूलभूत संकल्पनांचा प्रत्यक्ष व्यवहारात कसा उपयोग करावा, यासाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित करून प्रशिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक व्यावसायिक कौशल्य निर्माण होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक श्री. मेहुल मेहता, चार्टर्ड अकाउंटंट, सातारा यांनी सांगितले की, कॉमर्स विद्या शाखेतील विद्यार्थ्यांकडे मूलभूत संकल्पनांचे ज्ञान आधीच असते. त्याला जर व्यावसायिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची जोड दिली, तर चार्टर्ड अकाउंटंट व टॅक्स कन्सल्टन्सी क्षेत्रातील मनुष्यबळाची गरज पूर्ण होऊ शकते. चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशनच्या माध्यमातून विविध महाविद्यालयांमध्ये असे प्रशिक्षण वर्ग राबविण्यात येणार असून, सातारा जिल्ह्यात मुधोजी महाविद्यालय हे अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करणारे पहिले महाविद्यालय असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी जीएसटी प्रॅक्टिशनर श्री. चैतन्य सडेकर (सातारा) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कर सल्लागार क्षेत्रात कुशल व प्रशिक्षित विद्यार्थ्यांची मोठी गरज असून, महाविद्यालयांनी अशा प्रकारचे व्यावसायिक कोर्सेस आयोजित केल्यास तज्ज्ञांचे सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल.
या कार्यशाळेचा लाभ बी.कॉम. व बीबीए शाखेच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. मान्यवरांचे स्वागत प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. टी. पी. शिंदे, वाणिज्य विद्या शाखा प्रमुख प्रा. ज्योत्स्ना बोराटे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अशोक जाधव, वरिष्ठ लेखापाल श्री. कुमरे, तसेच अर्थशास्त्र व वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ललित वेळेकर यांनी केले, तर डॉ. सागर निकम यांनी आभारप्रदर्शन केले.









