डॉ.तुकाराम रोंगटे यांच्या साहित्यावर उद्या 21 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे विशेष आयोजन
पुणे, प्रतिनिधी:(प्रा.रोहिदास खेडकर), दि. २० फेब्रुवारी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे ह्यांच्या संपूर्ण साहित्यावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन शनिवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. डॉ. तुकाराम रोंगटे यांची आदिवासी साहित्याचे अभ्यासक आणि समीक्षक म्हणून त्यांचा मराठी साहित्यविश्वामध्ये नावलौकिक आहे. आजवर त्यांनी आदिवासी साहित्यामध्ये विविध साहित्यप्रकारांमध्ये ग्रंथलेखन आणि संपादन केले आहे. त्यांच्या या संपूर्ण लेखनकार्याची नोंद विविध माध्यमातून घेण्यात आली आहे. या भूमिकेतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग व रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवशीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ८९ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे चर्चासत्राचे उद्घाटन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. चर्चासत्राचे बीजभाषक म्हणून मराठीतील प्रसिद्ध लेखक आणि समीक्षक डॉ. केशव देशमुख यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच चर्चासत्रामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, प्राचार्य पांडुरंग भोसले, प्राचार्य संभाजी मलघे, प्राध्यापक प्रदीप पाटील इ. मान्यवर पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
तसेच या चर्चासत्रासाठी उपस्थित असणाऱ्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ प्रकाशन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या एकदिवशीय राष्ट्रीय चर्चासत्र एकूण चार सत्रामध्ये पार पडणार असल्याचे डॉ. तुकाराम रोंगटे यांनी सांगितले असून मराठी साहित्य विश्वामध्ये अभिरूची असणाऱ्या प्रेक्षकांना कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे.









