संजय गांधी निराधार योजना समित्या अध्यक्षाविना निराधार!
पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे दुर्लक्ष!
सातारा:(अमोल पवार ): सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये संजय गांधी निराधार योजना समित्या या कार्यरत असतात. या समितीच्या माध्यमातून तालुक्यातील निराधार विधवा, परितक्या महिला, दिव्यांग व्यक्ती, अनाथ मुले, तृतीयपंथी यांना शासनाचे प्रतिमहिना अनुदान मिळत असते. या आर्थिक मदतीतून त्यांच्या घर प्रपंचाला हातभार लागला जात असतो.
या समितीचे सचिव हे स्थानिक तहसीलदार असतात. व समितीचे सदस्य व अध्यक्ष हे स्थानिक आमदार यांचे शिफारशीद्वारे पालकमंत्र्यांना पाठवले जातात. पालकमंत्री हे स्वतःच्या शिफारशीचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवतात. जिल्हाधिकारी याद्वारे प्रत्येक तालुक्यात समिती गठीत करतात.
परंतु विधानसभेची निवडणूक होऊन एक वर्ष होऊन गेले तरी, स्थानिक आमदारांनी ही या गोष्टीचा पाठपुरावा न केल्यामुळे पालकमंत्र्यांनीही या गोष्टीकडे दुर्लक्ष केले असून समित्या आज अखेर गठित होऊ शकल्या नाहीत.
या समितीवर पक्षीय कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळत असते. परंतु त्यामुळे अनेक कार्यकर्ते या समितीच्या निवडीकडे डोळे लावून बसलेले आहेत.या समित्या नसल्यामुळे शासन स्तरावर प्रत्येक महिन्याला मासिक मीटिंग न होणे, अनेक निराधार लोकांची प्रकरणे मंजुरी अभावी रखडून पडणे, या समितीच्या कामासाठी लागणारे शासकीय कर्मचारी अपुरे असणे असे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आचारसंहितेपूर्वी समिती लवकरात लवकर स्थापन करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून जोर धरू लागली आहे.
” पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या विषयामध्ये लक्ष घालून समित्या गठीत करून,अपुरा कर्मचारी वर्ग पुरवठा करून,जिल्ह्यातील निराधार विधवा, परितक्त्या महिला, दिव्यांग व्यक्ती, यांना न्याय देण्याचे काम करावे.” श्री.विकास नाळे, फलटण तालुकाप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माजी सदस्य, संजय गांधी निराधार योजना समिती फलटण.
……………….
कोणाला मिळतो लाभ!
1) निराधार विधवा, परितक्त्या महिला
2) दिव्यांग व्यक्ती (40 टक्के वरील)
3) आई वडील नसलेली अनाथ मुले
4) तृतीयपंथी
5) कॅन्सर ग्रस्त व्यक्ती.
…………
अटी व नियम…
1) तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला
2) पतीच्या मृत्यूचे/घटस्फोट झालेले प्रमाणपत्र प्रमाणपत्र
3) दिव्यांगांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र (40 टक्के वरील)
4)रेशनकार्ड झेरॉक्स प्रत
5)आधार कार्ड झेरॉक्स प्रत
6) विहित नमुन्यातील अर्ज
…………….
किती मिळतो लाभ!..
1) निराधार महिला – 1,500 रु. – प्रति महिना.
2) दिव्यांग व्यक्ती – 2,500 रु – प्रति महिना.









