शिक्षणासोबत संस्कारांचा वारसा :
प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंटमध्ये प्रज्ञा योग शिबीर उत्साहात संपन्न
फलटण प्रतिनिधी दि. ३० : सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, कोळकी, ता. फलटण आणि लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन यांच्या संयुक्त सहभागाने आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून ३ दिवसीय प्रज्ञा योग (Intuition Process) शिबीराचे आयोजन यशस्वीरित्या करण्यात आले.
निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुरेश बेदमुथा, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना आर्ट ऑफ लिव्हिंग व प्रज्ञा योग या विषयांवर सखोल प्रशिक्षण या शिबीरात देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मानसिक, बौद्धिक व भावनिक विकासासाठी हे शिबीर अत्यंत उपयुक्त ठरले. शिबीरामध्ये ८ ते १३ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी उत्कर्ष योग आणि १४ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मेधा योग प्रशिक्षण देण्यात आले. एकाग्रता वाढवणे, आत्मविश्वास निर्माण करणे, अंतर्ज्ञान जागृत करणे तसेच तणावमुक्त जीवन शैलीचा अंगीकार करत आनंदाने राहण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी निवृत्त प्राचार्य रविंद्र येवले, सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका व लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या अध्यक्षा ला. सौ. संध्या गायकवाड, प्राचार्य सौ. सुजाता गायकवाड, पर्यवेक्षक महेंद्र कातुरे, समन्वयिका सौ. आहिल्या कवितके, सौ. माधुरी माने, शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच समारोपाला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांनी विद्यार्थ्यांना खूप मौल्यवान बाबी या शिबीरामध्ये सांगितल्या. दैनंदिन जीवनात प्राणायाम, सकारात्मक दृष्टिकोन, आनंदी जीवन व प्रेमळ संवाद, आई – वडील यांचा आदर करणे व योग्य आहार घेणे याबाबत मार्गदर्शन केले.
ज्ञानेश्वर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. शिबीरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी, स्मरणशक्ती, एकसंघता व आत्मशिस्त वाढीस लागल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. अतिशय उत्साही वातावरणात ही ३ दिवसांची कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे छान पार पडली.









