साहित्यिकांनी धर्मनिरपेक्षता जपली पाहिजे- जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस.दहिवडी येथे माणदेशी युवा साहित्य संमेलन उत्साहात संपन्न


साहित्यिकांनी धर्मनिरपेक्षता जपली पाहिजे- जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस

दहिवडी येथे माणदेशी युवा साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

 

माण तालुका प्रतिनिधी(ओंकार माने): माण तालुक्यातील भूमिपुत्र दुष्काळाच्या खुणा जपत लढतो आहे. भाकरीचा शोध घेत इथले लोकजीवन घडत आहे. दुष्काळाचा संस्कारी कलंक घेऊन तिथली माणसं आनंदाने जगत आहेत.माण तालुक्यामध्ये दुष्काळाचा कलंक असला तरी बुद्धिवाद्यांचा सुकाळ आहे. पुस्तकातून वाचन संस्कृती घडते व ज्ञानाची निर्मिती होते. वाचन संस्कृती मधून ज्ञान संस्कृती घडते. विश्व संस्कृती निर्माण होते.माण तालुक्यामध्ये एक नवा इतिहास, नवा भारत युवकांच्या रूपाने घडविला जात आहे. भारत मातेला न्याय देण्याचा प्रयोग तिथे केला जात आहे. भारतीय धर्मनिरपेक्षता प्रत्येकाने जपली पाहिजे व ती जपली जाते हे एक विशेष आहे.साहित्यिकांनी धर्मनिरपेक्षता जपली पाहिजे.साहित्य सूर्याच्या माध्यमातून नवा इतिहास जिल्हास्तरीय माणदेशी युवा स्पंदन साहित्याच्या माध्यमातून रचला जात आहे असे प्रतिपादन दहिवडी येथे मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र राज्य अनुदानित, साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन फलटण यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय माणदेशी युवा स्पंदन साहित्य संमेलनामध्ये उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत व 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी विचार मांडले.यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ स्वागताध्यक्ष व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जयवंत अवघडे, स्वराज करिअर अकॅडमीचे संस्थापक सुनील काटकर,महादेवराव गुंजवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

डॉ.श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की आजच्या काळामध्ये थोर विचारवंत, स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असे थोर समाज सुधारक ज्यांनी स्वातंत्र्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून लढा उभारला त्यांच्या आठवणी जागवल्या पाहिजेत. पत्रकारांनीही निरपेक्ष भावनेने काम केले तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समाजाला योग्य दिशेने घेऊन जाईल.संवेदना शून्य समाज निर्माण झाला.तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे शेतकरी आत्महत्या करतात मंत्री कधीच आत्महत्या करत नाहीत. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना वाली कोण हा साहित्यिका पुढे प्रश्न पडला पाहिजे. वेगवेगळ्या माध्यमातून समाजाचे शोषण होत आहे.यावरही भाष्य केले पाहिजे. स्वातंत्र्य सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन मिळवले. धर्म हा सात्विक असला पाहिजे क्रूर नसावा. विवेकानंद,महात्मा गांधी यांचा धर्म आम्हास मान्य आहे.सर्व जाती धर्मातून साहित्य निर्माण झाले पाहिजे.आज नको त्यांची मंदिरे बांधून उदो उदो केला जातोय. हे धर्माला खरोखरच मान्य आहे का? धर्माचे रूप बदलत जाऊन नको ती प्रवृत्ती समाजामध्ये घुसत आहे. सर्व जाती-धर्माचे लेखक कवी आहेत. परंतु त्यांचा आवाज दाबला जातोय की काय असा प्रश्न पडतो. सर्व माणसांना आदराने जगता आले पाहिजे ज्याप्रमाणे महापुरुषांनी समाजाला दिशा दिली त्या पद्धतीने आजच्या समाजाला दिशा मिळाली पाहिजे. विद्यार्थी सैनिक,सरकारी खुर्ची याला जात धर्म नसतो.संपूर्ण राजकीय व्यवस्था कुठे चालली आहे.भ्रष्टाचार व्याभिचार विकृती वाढली आहे.संस्कृती कुठे शोधायची. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना त्यांनी प्रत्येकाचा आदर केला. व सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र येऊन स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज हे आपले आदर्श असले पाहिजेत. सत्याची पूजा शुद्ध राष्ट्रीयत्वाची असली पाहिजे .

 

 

ज्ञानेश्वरांचे पसायदान विश्वात्मकतेचे होते. वेगवेगळ्या देशात संघर्ष सुरू आहे. हिटलर मेला असला तरी हिटलरी प्रवृत्ती संपलेली नाही. त्यामुळे भगवान महावीर, गौतम बुद्ध, महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज आहे .संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर यांच्या सामर्थ्याची बेरीज केली पाहिजे. दुःखमुक्त मानवता घडवूया,सर्वधर्म भावनेने जगूया.

 

यावेळी संमेलन अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ म्हणाले की ,माण तालुक्यातून समृद्ध साहित्य निर्माण होत आहे.माणूस वेडा होतो तेव्हा चांगले काम होते.हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. ते राज्य म्हणजे रयतेचे राज्य आपणाला समाज घडवायचा आहे, बिघडवायचा नाही.यासाठी साहित्यिकांनी आपले ज्ञान योग्य पद्धतीने वापरले पाहिजे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी,प्राचार्य शिवाजीराव भोसले व अन्य साहित्यिकांनी महाराष्ट्राला दिशा दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी भाषा जागतिक दर्जाची करण्यासाठी मराठी भाषेतील साहित्य परदेशी भाषेत भाषांतर होऊन परदेशात गेले पाहिजे. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहेत खेड्यापाड्यातील ग्रंथालयांना अनुदान मिळाले पाहिजे.स्वातंत्र्यानंतर सुराज्य करण्यासाठी साहित्यिकांची भूमिका फार महत्त्वाची ठरली आहे.व्यावहारिक व सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी सर्वांनी हातभार लावून वैभवशाली भारत निर्माण केला पाहिजे .आपणाला धर्म पाहिजे की भाकरी पाहिजे.धार्मिक उच्छाद रस्त्यावर आला आहे त्याला पायबंद घातला पाहिजे.

 

 

डॉ.जयवंत अवघडे म्हणाले की सातारा जिल्ह्यातील साहित्यिक चळवळ ही गतिमान करण्यासाठी अशा साहित्य संमेलनाची गरज असून ती गतिमान करण्याचे काम साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशनच्या वतीने होत आहे. जुन्या व नव्या साहित्यिकांचा मेळ घालून हे संमेलन यशस्वी होत आहे.

 

 

यावेळी स्वराज करिअर अकॅडमीचे संस्थापक सुनील काटकर यांनी साहित्य चळवळीला सहकार्य करण्याचे सांगून इथून पुढे माण तालुक्यातील साहित्य चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू व साहित्यिकांना पाठिंबा देऊ असे सांगितले.शाहीर नारायण कदम यांच्या पोवाड्याने कार्यक्रमांमध्ये रंगत आणली.

 

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश चव्हाण,सचिव राजेश पाटोळे,समन्वयक सुरेखा आवळे, चैताली चव्हाण, मोहसीन आतार, महादेव बोराटे, कांता भोसले, विक्रम गायकवाड, महादेव भोसले, गणेश ढेंबरे, तानाजी जगताप, सचिन अवघडे, दैनिक सकाळचे पत्रकार रुपेश कदम, पत्रकार आकाश दडस तसेच राज्याभरातून आलेल्या साहित्यिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

 

यावेळी माण तालुक्यातील साहित्यिकांचा सत्कार माणदेशरत्न मेडल देऊन करण्यात आला.तसेच माण तालुक्यातील साहित्यिकांचे ग्रंथ दालन याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माण तालुक्यातील साहित्यिकांची साहित्य सूची व लोकजागर या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी केले व आभार महादेवराव गुंजवटे तर सूत्रसंचालन युवा कवी सुयश आवळे यांनी केले.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!