जगातील सर्वात तरुण नगरसेविका कु.सिद्धाली अनुप शहा व माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून फलटण शहर पोलीस ठाण्यात रक्षाबंधन उत्साहात
फलटण, दि. २९ ऑगस्ट : राखी पौर्णिमेचे औचित्य साधून काल, दि. २८ ऑगस्ट रोजी जगातील सर्वात तरुण नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून फलटण शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकारी व अंमलदारांसोबत अत्यंत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले.
याप्रसंगी कु. सिद्धाली शहा यांनी पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. मात्र, या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही राखी बांधून एक आगळावेगळा आदर्श प्रस्थापित केला. या अनोख्या रक्षाबंधनाबाबत भावना व्यक्त करताना कु. शहा म्हणाल्या की, “बहिणीचे जो रक्षण करतो, तो भाऊ असतो आणि त्यालाच बहीण राखी बांधून रक्षाबंधन साजरे करते. आजच्या काळात महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी सुद्धा समाजासोबतच आम्हा महिलांचे खंबीरपणे रक्षण करतात. त्यामुळे त्यांच्या या कर्तृत्वाप्रती कृतज्ञता म्हणून त्यांनाही राखी बांधून आम्ही हे रक्षाबंधन साजरे केले आहे.”
या कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक सुनीता शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विजयमाला गाजरे यांच्यासह अनेक पोलीस हवालदार व अंमलदार उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी संवाद साधताना एक महत्त्वपूर्ण आवाहन केले. ते म्हणाले की, सर्वसामान्य महिलांना फलटण शहर पोलीस स्टेशन आणि येथील पोलीस अधिकाऱ्यांची ओळख व्हावी, तसेच पोलीस स्टेशनचे सविस्तर कामकाज कसे चालते हे महिलांना कळावे, यासाठी फलटण शहर पोलीस स्टेशन आणि माऊली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस स्टेशनच्या हॉलमध्येच महिलांसाठी एका विशेष माहितीपर शिबिराचे आयोजन करण्यात यावे. या समाजोपयोगी उपक्रमासाठी फलटण शहर पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.








