निधी आभावी सातारा जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोलफ्री (18002703600) नंबरची सेवा होणार बंद?
ग्रामीण भागात चोऱ्या, दरोडे,वन्य प्राणी हल्ला, आगीच्या घटना, पूर, भूकंप, नागरिकांना सतर्कतेसाठी उपयुक्त यंत्रणा!
सातारा: सातारा जिल्ह्यात 1236 ग्रामपंचायत हद्दीत विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती ग्रामस्थांना कळविणे, ग्रामसभेची वेळ,तारीख,विषय नागरिकांना कळविणे, पाणीपुरवठ्या बाबतच्या तात्काळ स्वरूपाच्या सूचना देणे, घरपट्टी पाणीपट्टी भरणा करणेबाबत सूचना देणे, वन्य प्राणी, बिबट्या, लांडगा यांच्या हल्ल्याची माहिती देणे, नैसर्गिक आपत्ती जसे पूर, भूकंप, वणवा,याबाबत नागरिकांना विविध सूचना देणे, विविध संकट काळात स्वत:च्या मोबाईलवरून सर्व गावकऱ्यांना एकाच वेळी कॉल च्या माध्यमातून सूचना देणे, सावध करणे किंवा मदतीला बोलावण्यासाठी उपयुक्त असणारी ग्राम सुरक्षा यंत्रणा जिल्हा परिषद सातारा व सातारा पोलीस दल यांचा सयुंक्त उपक्रम म्हणून ऑगस्ट 2023 रोजी कार्यान्वित करण्यात आली होती. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे माध्यमातून घटना/ दुर्घटनांमध्ये सर्व गावाला एकाच वेळी सूचना देण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोलफ्री 18002703600 नंबरवर केलेला कॉल, गावातील सर्व नागरिकांच्या मोबाईलवर तत्काळ प्रसारित होतो. जिल्ह्यातील गावांना सदर यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात फायदा आजवर झाला असून आजतागायत 18,450 पेक्षा जास्त वेळा ग्राम सुरक्षा यंत्रणेचा नागरिक व प्रशासनाने जिल्ह्यात वापर कलेला आहे. सातारा जिल्ह्यातील 9,45,000 ग्रामस्थ ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी आहेत.
ग्राम सुरक्षा यंत्रणा वापरामुळे जिल्ह्यात झालेला फायदा.
उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीत 7 तलवारी व पिकअप सह आरोपी जेरबंद करण्यात यश, भुईंज पोलीस स्टेशन हद्दीतील ओझर्डे गावातील 1 व्यक्ती व 9 बैलांना पुराच्या पाण्यातून वाचवण्यात यश, कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील साकुर्डे गावातील आगीच्या घटनेत 20 एकर ऊस जाळिता पासून वाचवण्यात यश, औंध पोलीस स्टेशन हद्दीतील पळशी गावातील 5 वर्ष वयाचा हरवलेला मुलगा 1 तासात शोधण्यात यश, मल्हारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील येराडवाडी गावातील आगीच्या घटनेत 40 एकर फॉरेस्ट जाळिता पासून वाचवण्यात यश, सातारा तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कुस खु. गावातील आगीच्या घटनेत 90 एकर गायरान जाळिता पासून वाचवण्यात यश, रहिमतपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सुरली गावातील आगीच्या घटनेत 20 एकर ऊस जाळिता पासून वाचवण्यात यश, कोयनानगर पोलीस स्टेशन हद्दीतील नेचल गावातील आगीच्या घटनेत 50 एकर गायरान जाळिता पासून वाचवण्यात यश, तळबीड पोलीस स्टेशन हद्दीतील वराडे गावातील आगीच्या घटनेत 07 एकर गायरान जाळिता पासून वाचवण्यात यश, शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील कानवडी गावातील गोठा व प्लायवूड कंपनीला लागलेली आग विझवण्यात यश, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत शेरेचीवाडी येथे डीपी चोरीची घटना टाळण्यात यश, पुसेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वर्धनगड गावातील फॉरेस्टला लागलेली आग विझवण्यात यश, औंध पोलीस स्टेशन हद्दीतील नांदोशी गावातील चाऱ्याला लागलेली आग विझवण्यात यश, लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील आदर्की खु. गावातील गंभीर गुन्ह्यातील आरोपी जेरबंद करण्यात यश, सातारा तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचणी गावातील चाऱ्याला लागलेली आग विझवण्यात यश,फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मानेवाडी गावातील खाजगी गायरानाला लागलेली आग विझवण्यात यश, शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील शिरवळ गावातील 6 दुकाने आगी पासून वाचवण्यात ग्रामस्थांना यश,लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील कापशी गावातील टू व्हीलर चोरीची घटना टाळण्यात ग्रामस्थांना यश,महाबळेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील वानवली गावातील 2 चंदनचोर जेरबंद करण्यात ग्रामस्थ व पोलीस दलास यश, मेढा पोलीस स्टेशन हद्दीतील रामघेघर गावातील आगीच्या घटनेत जीवित व वित्त हानी टाळण्यात ग्रामस्थांना यश,दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील शिखर शिंगणापूर गावातील ATM चोरीची घटना टाळण्यात ग्रामस्थांना यश, वडूज पोलीस स्टेशन हद्दीतील मायणी गावातील सोन्याच्या दुकानातील चोरीची घटना टाळण्यात ग्रामस्थांना यश, पाटण पोलीस स्टेशन हद्दीतील झाकडे गावात 2 चोर पल्सर गाडीसह पकडण्यात ग्रामस्थांना यश, मसूर पोलीस स्टेशन हद्दीतील पाचुंद गावातील गायरान क्षेत्राला लागलेली आग विझवण्यात ग्रामस्थांना यश, तळबीड पोलीस स्टेशन हद्दीतील वराडे गावातील डोंगराला लागलेली आग विझवण्यात ग्रामस्थांना यश, वडूज पोलीस स्टेशन हद्दीतील पाचवड गावातील डोंगराला लागलेली आग विझवण्यात ग्रामस्थांना यश, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील काशीदवाडी गावातील डी.पी. ट्रान्सफार्मर चोरीची घटना टाळण्यात ग्रामस्थांना यश, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील बरड गावातील हरवलेली वयोवृद्ध वारकरी महिला शोधण्यात यश, लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील अद्रकी खुर्द तालुका फलटण गावातील चोरीला गेलेल्या एक ते दीड लाख रुपये किंमतीच्या दोन गाई शोधण्यात यश, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरद तालुका फलटण गावातील 20 एकर ऊस आगीपासून वाचवण्यात यश, या काही प्रातिनिधिक घटना आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही वेगवेगळ्या सूचना जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एकाच वेळी देण्यासाठी यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला तत्काळ सूचना मिळाल्याने घटना/दुर्घटनांत नागरिकाची तातडीने मदत मिळत होती. सरकारी योजनांची माहिती तत्काळ जनतेपर्यंत पोहचत होती. परंतु जिल्हा प्रशासनाकडे वारंवार निधीसाठी पाठपुरावा करूनही ग्राम सुरक्षा यंत्रणा अविरत सुरु ठेवण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद ग्रापंचायातींकडून न झाल्याने व त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर (18002703600) ची सेवा दिनांक 30/06/2026 पासून जिल्ह्यात पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या व्यवस्थापनाकडून घेण्यात आला आहे.
ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर (18002703600) ची सेवा दिनांक 30/06/2026 पासून जिल्ह्यात पूर्णपणे बंद होणार आहे.
सातारा जिल्ह्याचे पूर्वीचे एसपी समीर शेख यांनी या सामाजिक उपक्रमाला सुरुवात केली होती. परंतु मध्यंतरीच्या काळात याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून यामुळे आज अखेर ही यंत्रणा बंद पडण्याच्या अवस्थेत आहे. यामुळे ग्रामीण भागात चोऱ्या, दरोडे, नागरिकांसाठी सतर्कतेचे इशारे गावाला देणे बंद पडणार असून पोलीस यंत्रणेवरती ताण निर्माण होणार आहे. सातारा जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.









