जैन धर्मियांच्या योगदानामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा – डॉ. श्रीमंत कोकाटे
फलटण: फलटण येथे 27 वे मराठी जैन साहित्य संमेलनाचे उद्घाटन स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य लक्ष्मीसेन महाराज यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून पार पडले. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की जैन धर्मियांच्या योगदानामुळेच आज केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे.
यावेळी डॉ.श्रीमंत कोकाटे यांनी आपल्या भाषणामध्ये जैन धर्मियांचे तत्त्वज्ञान, जैन धर्मियांची संस्कृती किती प्राचीन आहे याचे विविध दाखले दिले. जैन धर्मियांचे पहिले तीर्थंकर ऋषभ देव यांचे संबंध हे प्राचीन सिंधू संस्कृतीशी होते. 24 वे तीर्थंकर भगवान महावीर व तथागत गौतम बुद्ध हे समकालीन होते. जैन तत्त्वज्ञानाने जगाला अहिंसा धर्म शिकवला असून आज जगामध्ये जी देशा देशांमध्ये युद्ध चालू आहेत. निरपराध लोकांच्या वरती हिंसा, हत्या चालू आहे यावर एकच उपाय म्हणजे जैन तत्त्वज्ञानातील अहिंसेचा मार्ग होय.
जैन धर्मीयांसाठी पवित्र स्थान असलेले श्रवणबेळगोळ येथे 11 व्या शतकातील शिलालेख सापडलेले असून यामध्ये ते मराठी भाषेमध्ये लिहिलेले आहेत. यावरूनच केंद्र सरकारच्या कडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असल्याचे प्रतिपादन डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केले.
तसेच त्यांनी जैन बांधवांचे सामाजिक योगदान याविषयी बोलताना म्हटले की, वालचंद नगर येथे स्वतंत्रपूर्वकाळामध्ये उद्योग व्यवसाय उभा करणारे शेठ वालचंद हिराचंद हे जैन धर्मीय होते. रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून गोरगरीब बहुजन समाजातील लोकांना शिक्षित करण्याचे कार्य करणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे सुद्धा जैन धर्माचेच होते. अशी विविध उदाहरणे देऊन त्यांनी जैन धर्मियांचे सामाजिक योगदान या विषयावर आपले मत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाला. स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य लक्ष्मीसेन महाराज कोल्हापूर,स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महाराज नांदणी, जेष्ठ साहित्यिक विजय दादा आवटी कोल्हापूर,स्वागताध्यक्ष डॉ.सूर्यकांत शांतीलाल दोशी, प्रा. डी.ऐ .पाटील, मंगेश दोशी, आलोक दोशी, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, मुधोजी महाविद्याल फलटणचे इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ.अनिल टीके,प्रा.निळकंठ निंबाळकर,प्रा.प्रवीण निंबाळकर, जैन समाजातील नागरिक महिला विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.









