महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी सासकल येथे कृषी विभागाचा प्रचार-प्रसार; बांधावर जाऊन मार्गदर्शन!
महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन!
सासकल, ता. फलटण : महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्राची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी सासकल येथे कृषी विभागाच्या वतीने महिला शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी सेवा रत्न तथा सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव, सासकल यांनी महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रासाठी आवश्यक पात्रता, अर्ज प्रक्रिया व त्याचे फायदे याबाबत माहिती दिली. १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या आणि शेती व्यवसायात प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या महिला या प्रमाणपत्रासाठी पात्र ठरू शकतात.
पिकांची लागवड, बीजोत्पादन, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय, कृषी-वनीकरण, अळंबी लागवड, फलोत्पादन व पुष्पोत्पादन आदी शेतीपूरक व्यवसायात कार्यरत महिलांचाही यामध्ये समावेश आहे. तसेच भाडेपट्ट्याने किंवा बटाईने शेती करणाऱ्या महिला, भूमिहीन शेतकरी, शेतमजूर, रोपमळा मजूर व पशुचारक यांनाही व्यापक पात्रतेनुसार लाभ मिळू शकतो.
महिला शेतकरी प्रमाणपत्रामुळे शासकीय कृषी योजनांचा लाभ, कृषी कर्ज, पीक व कृषी विमा, कृषी निविष्ठा तसेच कृषी विस्तार सेवा मिळविणे अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत महिला शेतकऱ्यांमध्ये या उपक्रमाबाबत जनजागृती करण्यात येत असून, कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
“महिलांचे शेतीतील योगदान मान्य करूया; महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख देऊया!” या संदेशातून सासकल परिसरातील महिला शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.








