- मुलींचे न्यू इंग्लिश स्कूल लोणंदमध्ये उत्साहपूर्ण गर्ल गाईड निसर्ग सहवास शिबिर संपन्न
आरडगाव प्रतिनिधी((प्रतिक भोईटे )दि. १८ डिसेंबर २०२५ – रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल (मुलींचे), लोणंद येथे बुधवारी (१७ डिसेंबर २०२५) गर्ल गाईडच्या वतीने आयोजित एकदिवसीय निसर्ग सहवास शिबिराचा उत्साहपूर्ण मेळावा यशस्वीपणे पार पडला. तब्बल १५० गर्ल गाईड्सनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि विविध कौशल्यपूर्ण उपक्रमांद्वारे निसर्गाशी जवळीक साधली.
दिवसभर चाललेल्या या शिबिरात विद्यार्थिनींनी तंबू बांधणे, ध्वजारोहण, चुलीवर स्वयंपाक तयार करणे, तंबूची आकर्षक सजावट आणि संध्याकाळी शेकोटी कार्यक्रम असे रोमांचक उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडले. या उपक्रमांमुळे मुलींमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्वगुणांचा विकास झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. गोळे सर होते. प्रमुख पाहुण्या म्हणून लोणंद नगरीच्या माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका सौ. सीमा खरात आणि पालक सौ.प्रियांका खरात यांची उपस्थिती लाभली. पालकांनीही शिबिरास भेट देऊन मुलींच्या कौशल्यांचे आणि उत्साहाचे भरभरून कौतुक केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती पवार मॅडम यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून तर सौ. घनवट मॅडम आणि बनकर मॅडम यांनी सहाय्यक म्हणून अथक परिश्रम घेतले. परीक्षक म्हणून श्री. जगताप सर आणि श्रीमती अहिवळे मॅडम यांनी मुलींच्या कामगिरीचे मूल्यमापन केले.निसर्गाच्या सान्निध्यात आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झालेल्या या गर्ल गाईड मेळाव्याने सर्व सहभागींना अविस्मरणीय अनुभव दिला. असे उपक्रम मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरत आहेत.









