धुमाळवाडीत 299 व सासकल येथील 412 महिलांना शेतकरी प्रमाणपत्रासाठी ग्रामसभांची मान्यता व प्रमाणपत्र वितरण!
कृषिसेवारत्न सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव यांच्या कामाची तालुक्यात चर्चा; इतर कृषी सहाय्यकानी अशाच पद्धतीने कामे करावीत!
*राज्यातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडीत २९९ महिला शेतकरी प्रमाणपत्र अर्जांना मान्यता प्रमाणपत्र वितरण*
धुमाळवाडी, ता. फलटण : महाराष्ट्र राज्यातील पहिले ‘फळांचे गाव’ म्हणून ओळख असलेल्या धुमाळवाडी येथे २९९ महिला शेतकरी प्रमाणपत्र अर्जांना ग्रामसभेत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्राची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालयात दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जांची पात्रता व पडताळणी करण्यात आली. धुमाळवाडीतील २९९ महिलांनी अर्ज केले होते. पडताळणीनंतर सर्व २९९ अर्जांना मान्यता देण्यात आली.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी तथा कृषी सेवारत्न सचिन जाधव यांनी महिला शेतकरी प्रमाणपत्राची पात्रता, अर्ज प्रक्रिया तसेच प्रमाणपत्रामुळे मिळणाऱ्या सुविधांबाबत मार्गदर्शन केले. प्रमाणपत्रामुळे महिला शेतकऱ्यांना विविध शासकीय कृषी योजना, कृषी कर्ज, पीक विमा, कृषी निविष्ठा तसेच कृषी विभागाच्या विविध सेवांचा लाभ घेणे सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी मोनिका मुळीक, कृषी सखी माधुरी हुंबे, ग्रामपंचायत सदस्य व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. ग्रामसभेस ग्रामस्थ व महिला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
*४१२ महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी सासकल येथील ग्रामसभा मध्ये मान्यता*
सासकल, ता. फलटण : महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्राची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
महिला शेतकरी प्रमाणपत्रसाठी महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले होते त्या अनुषंगाने दिनांक २ आक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०. ३० वाजता सासकल येथे ग्रामसभा आयोजन करण्यात आले होते.
या ग्रामसभे मध्ये ४१२ महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी मंजूर करण्यात आले
कृषी सेवा रत्न तथा सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव, सासकल यांनी महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रासाठी आवश्यक पात्रता, अर्ज प्रक्रिया व त्याचे फायदे याबाबत माहिती दिली. १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या आणि शेती व्यवसायात प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या महिला या प्रमाणपत्रासाठी पात्र ठरू शकतात.
पिकांची लागवड, बीजोत्पादन, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय, कृषी-वनीकरण, अळंबी लागवड, फलोत्पादन व पुष्पोत्पादन आदी शेतीपूरक व्यवसायात कार्यरत महिलांचाही यामध्ये समावेश आहे. तसेच भाडेपट्ट्याने किंवा बटाईने शेती करणाऱ्या महिला, भूमिहीन शेतकरी, शेतमजूर, रोपमळा मजूर व पशुचारक यांनाही व्यापक पात्रतेनुसार लाभ मिळू शकतो.
महिला शेतकरी प्रमाणपत्रामुळे शासकीय कृषी योजनांचा लाभ, कृषी कर्ज, पीक व कृषी विमा, कृषी निविष्ठा तसेच कृषी विस्तार सेवा मिळविणे अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत महिला शेतकऱ्यांमध्ये या उपक्रमाबाबत जनजागृती करण्यात येत असून, कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यावेळी ग्रामसभा अध्यक्ष मुख्याध्यापक कांबळे सर, ग्रामपंचायत अधिकारी अशोक सापते, हंणमत मुळीक, राजेंद्र घोरपडे, लता मुळीक,दिनेश मुळीक, वैशाली मुळीक, सी आर पी शिवाली जगदाळे, कृषी सखी कोमल मुळीक,तसेच ग्रामस्थ, महिला उपस्थित होते
“महिलांचे शेतीतील योगदान मान्य करूया; महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख देऊया!” या संदेशातून सासकल परिसरातील महिला शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.









