निरगुडी गावात कावीळ या साथीच्या आजाराचे थैमान!
10 ते 12 रुग्ण आढळले! आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर.
ग्रामपंचायतचे दुर्लक्ष सामाजिक कार्यकर्ते- महेंद्र गोरे
- फलटण प्रतिनिधी : मागील आठवड्यापासून निरगुडी तालुका फलटण गावामध्ये कावीळ या साथीच्या आजाराने थैमान घातलेले असून याचा पहिला पेशंट हा दिनांक 3 डिसेंबर रोजी सापडला असून आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. पाण्याच्या स्त्रोताचे नमुने हे तपासणीसाठी खंडाळा येथे पाठवलेले असून लवकरच या बाबतीत स्वयंस्पष्ट अहवाल येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी संतोष कोंडके यांनी सांगितले आहे.
या विषयाला अनुसरून गावातील ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश कुंभार यांना निवेदन दिले आहे. निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, गावातील महात्मा फुले नगर मध्ये 10 ते 15 पेशंट हे कावीळ या आजाराचे आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होतोय का? अशी शंका वाटू लागली आहे. त्यामुळे संपूर्ण गावाला होणाऱ्या पाणीपुरवठ्याची तपासणी केली जावी. प्रत्येक कुटुंबाला ग्रामपंचायतकडून मेडिक्लोअरचे वाटप केले जात होते. परंतु ते अनेक वर्षापासून बंद केले आहे.मेडिक्लोअरचे ग्रामपंचायतने वाटप करावे. तसेच सदर अर्जाची गांभीर्याने दखल घेऊन कावीळ या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती केली आहे.
दरम्यान सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी आमदार सचिन पाटील यांना फोन लावून सदर घटनेबद्दल वस्तुस्थिती सांगितली असता आमदार सचिन पाटील यांनी गटविकास अधिकारी यांना फोन लावून तात्काळ सर्व शासकीय यंत्रणांना उपायोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी ग्रामपंचायतच्या प्रशासनावरती ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. ग्रामसेवक श्री. कदम हे योग्य प्रतिसाद देत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निवेदनावर महेंद्र गोरे ,लहू गोरे, देवराज गोरे, शारदा आवटे, जगन्नाथ गोरे ,संदीप हुंबरे, माधुरी केंगार, सुप्रिया गोरे, सुरेखा गोरे, अमोल गोरे , अभिजीत गोरे, अजित गोरे यांच्या सह्या आहेत.









