फलटण पंचायत समिती प्रशासनाच्यावतीने माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी सुसज्ज – गटविकास अधिकारी अक्षय घावटे
पंचायत समितीची मासिक सभा खेळीमेळीत
फलटण: पंचायत समिती फलटणची मासिक सभा दिनांक 8/07/2026 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती फलटणचे सभागृहामध्ये मा. सभापती कु. शिवांजली भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
या सभेत सुरवातीला खामगाव येथील दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे निधन झाले. निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच श्री. बबन रामचंद्र मुळीक रा. सासकल यांना विविध प्रकारच्या फळ पीक लागवडीमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित २०२४ पुरस्कार मिळाल्याबद्दल पंचायत समिती सभेत मुळीक दापत्यांचा सत्कार करण्यात आला व अभिनंदनचा ठराव घेण्यात आला.
सभेमध्ये तालुक्यातील विविध विभांगाचा आढावा घेण्यात आला.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 च्या अनुषंगाने कामकाजाबाबत आढावा घेण्यात आला. आढावा घेऊन प्रशासनास सेवेसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पंचायत समिती सभेसाठी काही विभाग वारंवार सूचना देऊन मुद्धाम गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबत सभागृहांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली व संबंधित विभागास रीतसर गैरहजेरी बद्दल पत्र व्यवहार करण्यास ठराव घेण्यात आला.
नूतन गटविकास अधिकारी श्री अक्षय महादेव घावटे यांची पहिलीच मासिक सभा असल्याने त्यांचे पंचायत समितीच्या वतीने स्वागत करून अभिनंदनचा ठराव घेण्यात आला.
सभेचे कामकाज सभापती कु. शिवांजली भोसले, उपसभापती श्री.अमोल सस्ते तसेच पंचायत समिती सदस्य / सदस्या आणि सचिव श्री. अक्षय घावटे गटविकास अधिकारी श्री. प्रकाशकुमार बोंबले सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरण पार पडली.









