मूल्याधिष्ठित विचाराने मानवी जीवन यशस्वी होते : प्रा. मोहन सरडे
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दी निमित्त व्याख्यान संपन्न
अकलूज, दि. १५ जुलै : प्राचार्य शिवाजीराव भोसले तत्त्वज्ञान विचार मंच आणि शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जयंती व जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ‘‘प्राचार्य शिवाजीराव भोसले : व्यक्ती आणि विचार’’ या विषयावर विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथील माजी तत्त्वज्ञान विभागप्रमुख प्रा. मोहन सरडे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. सरडे यांनी आपल्या व्याख्यानात प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत मूल्याधिष्ठित विचार, नैतिकता आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यांच्या आधारे मानवी जीवन अधिक यशस्वी व अर्थपूर्ण बनते, असे प्रतिपादन केले. आपल्या जीवनातील जडणघडणीत प्राचार्य भोसले यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. प्राचार्य, कुलगुरू, लेखक आणि प्रभावी वक्ते म्हणून प्राचार्य भोसले यांनी केलेल्या कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शिवप्रसाद टिळेकर होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ज्ञान हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले.
या प्रसंगी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे इतिहास विभागाचे माजी प्रमुख डॉ. अरुण भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महाराष्ट्रातील विविध भागांतील तत्त्वज्ञान अभ्यासक, संशोधक आणि तत्त्वज्ञानप्रेमी मोठ्या संख्येने ऑनलाइन सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब मुळीक यांनी केले. विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनीलदत्त गवरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. नवनाथ रासकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. सुनील भोईटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संजय वाघमारे यांनी मानले.









