सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रंगला बोलीभाषांचा जागर
पुणे प्रतिनिधी:(प्रा.रोहिदास खेडकर:)२० जानेवारी
महाराष्ट्र शासनाच्या भाषा पंधरवड्या अंतर्गत,
भाषा संचालनालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग, यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला ‘बोलींचा जागर’ हा कार्यक्रम आज विद्यापीठात मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्साहाला कार्यक्रमाच्या प्रारंभी काढण्यात आलेल्या भाषाफेरीपासूनच सुरुवात झाली. “मराठीचा अभिमान, बोलीभाषेचा सन्मान”, “बोली जगवा, बोली वाचवा” अशा घोषणा देत काढलेल्या या भाषाफेरीत अरुण गीते (संचालक, भाषा संचालनालय), भाषाभ्यासक डॉ. केशव देशमुख, मावळ बोलीचे अभ्यासक डॉ. मारुती आढळ, डॉ. तुकाराम रोंगटे (मराठी विभागप्रमुख), मुकुंद गोरे (वरिष्ठ अनुवादक, भाषा संचालनालय), प्रा. उमेश सिरसट, डॉ. अनिल पवळ, डॉ. अमोघसिद्ध चेंडके, डॉ. सदाशिव शिंदे, डॉ. सुमित साळुंखे इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते.
बोलीभाषेचे जतन आणि संवर्धन व्हावे या भूमिकेतून
वक्त्यांच्या भाषणांआधी, आदिवासी बोलींचा समावेश असलेली आदिवासी नृत्येगीते आणि पथनाट्याचे विशेष सादरीकरण करण्यात आले. सखाराम गांगड आणि इतर सहकाऱ्यांनी आदिवासी जीवनसंस्कृती व भाषेचे दर्शन घडवून उपस्थितांची मने जिंकून घेतली.
‘बोलीचा जागर’ या मुख्य सैद्धांतिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ रोंगटे यांनी केले. त्यावेळी त्यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करून बोली भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. भाषा संचालक अरुण गीते यांनी आदिवासी कलाकारांचे अभिनंदन करून त्यांच्या कलेचे कौतुक केले. ‘अभिजात कला या व्यासपीठावर होतात, परंतु आदिवासी बोली, नृत्य ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे,’ असे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी ग्रामीण बोली आणि शहरी बोली यामधील असणार फरक समजावून सांगितला.”
प्रमुख मार्गदर्शक डॉ. केशव देशमुख यांनी ‘बाजार बोली’ या दुर्लक्षित विषयावर मार्गदर्शन केले. बाजार बोलीच्या संदर्भात प्रतिपादन करताना त्यांनी बाजार भाषेचे स्वरूप आणि वैशिष्ट यांचा आढावा घेऊन बाजार बोलीची मूल्यात्मक मांडणी करून भाषा अभ्यासाची नवी दिशा असल्याचे त्यांनी सांगितले. बाजारामधील विविध प्रसंगाचे चित्रण आणि संवाद त्यांनी विनोदी शैलीतून सांगून उपस्थितांना संबोधित केले.
डॉ. मारुती आढळ यांनीही मावळ बोलीच्या संदर्भात विचार व्यक्त केले. मावळ भाषेचे स्वरूप आणि ऐतिहासिक वाटचालीचा आढावा घेत त्यांनी समर्पक उदाहरण देवून मावळ बोलीची विशेषता सांगितली.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ. तुकाराम रोंगटे यांनी करत असताना उपस्थितांना बोली भाषेची असणारी उपयोगिता ही भाषिक वृद्धीसाठी किती अपरिहार्य आहे, यासंबधीचे मत व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला आणि उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
स्वर्ग म्हणजे आभाळ नाहीतर स्वर्ग म्हणजे निसर्ग : सखाराम गांगड
सखाराम गांगड यांनी आपल्या कलेविषयीचा ऐतिहासिक वारसा सांगत असताना आदिवासी भाषा आणि संस्कृती याविषयीचे विचार व्यक्त केले. ‘आमच्या वाडवडिलांपासून ही कला आमच्याकडे आलेली आहे, या कलेचे दिल्ली याठिकाणी राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मान झालेला आहे, तीच कला आम्ही जपत आहोत’ आमच्या कलेचा आणि भाषेचा सन्मान सरकारने केला तसेच आम्हाला विद्यापीठात बोलावून आमची भाषा आणि कला यांचा सन्मान केला याबद्दल आम्हाला मनापासून आनंद वाटतो आहे. आम्ही सरकारचे उपकार कधीही विसरणार नाही.’ असे सखाराम गांगड यांनी अत्यंत भावनिक होत मत व्यक्त करून महाराष्ट्र शासन, मराठी विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ. तुकाराम रोंगटे यांनी करत असताना उपस्थितांना बोली भाषेची असणारी उपयोगिता ही भाषिक वृद्धीसाठी किती अपरिहार्य आहे, यासंबधीचे मत व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला आणि उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उमेश सिरसट यांनी केले. तसेच डॉ. सिद्धार्थ लांडे यांनी कार्यक्रसाठी आलेल्या पाहुण्यांचे तसेच उपस्थितांचे आभार मानले.









