संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांसाठी प्राथमिक आरोग्य सेवा उपक्रम उत्साहात संपन्न
तरडगाव | प्रतिनिधी:प्रमोद महानुभाव
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळ्याचे गुरुवार, दि. १६ जुलै २०२६ रोजी तरडगाव येथे आगमन व मुक्काम उत्साहात संपन्न झाला. या पावन सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी, भाविक व भक्तांनी तरडगाव नगरीत दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सेवाभावी भावनेतून मानद पशुकल्याण अधिकारी श्री अवधूत धुमाळ (तरडगाव) यांच्या संकल्पनेतून ‘वारकरी प्राथमिक आरोग्य सेवा’ हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांना प्राथमिक वैद्यकीय उपचार, आवश्यक औषधे व गोळ्यांचे वितरण, रक्तदाब तपासणी, तसेच मालीश सेवा उपलब्ध करून देण्यात आली. यासोबतच आरोग्यविषयक मार्गदर्शन करत “आरोग्यदृष्ट्या सजग वारकरी, सुरक्षित वारी” हा जनजागृतीपर संदेशही देण्यात आला.
या उपक्रमाचा शुभारंभ पंचायत समिती फलटणच्या सभापती कु. शिवांजलीताई भोसले यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी श्री अवधूत धुमाळ यांनी त्यांचे वृक्षरोप देऊन स्वागत केले.
दिवसभर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, साताराच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत समर्पित भावनेने वारकऱ्यांची आरोग्य सेवा केली. उपक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री अवधूत धुमाळ यांनी केले. या सेवाभावी उपक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने वारकरी, भाविक व भक्तांनी घेतला. उपस्थित वारकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांच्या सेवाकार्याचे मनापासून कौतुक केले.









