दैदिप्यमान यश! लोणंदच्या आराध्या बागवडेचा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक
लोणंद प्रतिनिधी(प्रतिक भोईटे) : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत आयोजित विभागीय वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज (मुलींचे), लोणंदच्या विद्यार्थिनीने उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे नाव उज्वल केले आहे.
इयत्ता ५वी ते ७वी (लहान गट) मध्ये एकूण १२० स्पर्धकांमध्ये कुमारी आराध्या अमोल बागवडे (इयत्ता ७वी) हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.आराध्याला विजेतेपदाचे पारितोषिक म्हणून आकर्षक चषक, प्रमाणपत्र आणि रोख ७०० रुपये असे बक्षीस मिळाले. तिच्या या दैदिप्यमान यशाने शाळेची दरवर्षीची यशाची परंपरा कायम राहिली आहे.याच स्पर्धेत शाळेच्या दुसऱ्या विद्यार्थिनी कुमारी राजनंदिनी गणेश कारंडे (इयत्ता ७वी) हिने उत्साहाने सहभाग घेऊन प्रमाणपत्र प्राप्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य श्रीयुत मिलिंद माने यांनी तसेच मुख्याध्यापक श्री.गोळे दत्ता यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे व मार्गदर्शिका सौ.खताळ मॅडम यांचे अभिनंदन केले आहे. अशा यशस्वी विद्यार्थ्यांमुळे शाळेचे नाव राज्यभर उंचावत राहो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.









