विद्यार्थ्यांनी देशविदेशी साहित्य वाचून समृद्ध व्हावे-
प्रा. डॉ.सुभाष वाघमारे
पनवेल प्रतिनिधी: ‘ साहित्य ही मनाची नवनिर्मिती असते..साहित्य हे लेखकाला हवे ,नको असणारे जग असते.साहित्य संस्कृतीचे प्रतिबिंब असते तसे आधुनिक जीवनाचे स्वप्न असते.साहित्य वाचनाने मने उदात्त आणि विशाल होतात. साहित्य हे माणुसकी उभी करत असते. साहित्य वाचनाने मन व बुद्धी यांचा विकास होतो. साहित्यातील नव्या अनुभवाने नवी रहस्ये माहीत होतात. साहित्याने कलानंद मिळतो आणि मन तृप्त होते. साहित्य नैतिक उपदेश करत असते त्यामुळे मनावर संस्कार होतात . साहित्यातील विविध अनुभव वाचून जीवनाची समज वाढतत जाते. एक चांगला नागरिक घडवण्याचे काम साहित्य करते. आपण आज आधुनिक काळात मोबाईलवर डिजिटल वाचन करत असलो तरी पुस्तक हातात घेऊन वाचन करण्याने मन एकाग्र होते. साहित्य रुक्ष जीवनात सौंदर्य आनंद निर्माण करत असते म्हणूनच विद्यार्थ्यांनी देशविदेशी साहित्य वाचून आपले जीवन समृद्ध करावे’ असे विचार छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. ते पनवेल तालुक्यातील गव्हाण कोपर येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन भगत ज्युनियर कॉलेजमध्ये ‘साहित्य जीवनास दिशादर्शक’ या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या, प्राचार्या ज्योत्स्ना ठाकूर या उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना साहित्याचे जीवनातील महत्व सांगण्यासाठी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
घराघरात वाचन संस्कृती तयार करण्याविषयीचे आवाहनं करताना ते पुढे म्हणाले की “वाचन हे जीवनास समृद्ध करण्याचे टॉनिक आहे. वाचन केल्याने माणसाचे शहाणपण वाढत जाते. मनाचे नैराश्य आणि रोगराई दूर करण्यासाठी वाचन ही एक विश्वासार्ह संजीवनी आहे.लोकशाहीत ,वाणी आणि लेखणी यांचे महत्व मोठे असून त्यांचा विकास करण्यास साहित्य उपयोगी पडते. विद्यार्थ्यांना व्यवसाय व नोकरी करताना ,मुलाखत देत असताना योग्य संवाद करणे अभिप्रेत असते. ज्ञान व जीवन व्यवहार ,भावना सूक्ष्म रीतीने समजण्यासाठी साहित्य विविध क्षेत्रातील पुस्तकांचे वाचन करावे .आपल्या जीवनाच्या पानावर सुंदर भावनाक्षरे चित्रित करण्यासाठी साहित्य ही प्रेरणाशक्ती असते. साहित्यात दुःख वेदना यांचे तळे दिसते ,तसे हिमतीचे मळेही दिसतात. भोवताल समजण्यासाठी त्या त्या काळातील नवनवीन पुस्तकांचे वाचन करा ,नित्यनेमाने वाचन करा. वेगवेगळी तंत्रज्ञान ,कौशल्ये आत्मसात करा .शिक्षण कधीच मध्ये सोडू नका.
लोकनेते रामशेठ ठाकूर हे न्हावा खाडी गावातून शिक्षण घेऊन अनेकांना मदत करण्याचे मोठे काम करीत आहेत.या देशात त्यांच्या सारखे दानशूर मला कोणीही दिसत नाही. त्यांच्याकडून जीवन व्यवहार समजून घेऊन स्वत: स्वावलंबी होऊन ,इतरांनाही स्वावलंबी बनवण्याचा आदर्श घ्यावा. सामाजिक बांधिलकी काय असते,हे त्यांच्या आचरणातून व्यक्त होते. महात्मा जोतीराव फुले,कर्मवीर भाऊराव पाटील , डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींची कामगिरी वाचून प्रेरणा घ्या. वाचन आणि जीवन याचा सबंध असून त्यातूनच माणसाचे कर्तृत्व घडत असते.म्हणूनच आदर्श व्यक्तिमत्वांचे वाचन करा असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास उगले एस.के ,आर.एन.चौधरी ,ए.आर पाटील.जे. डी. सोनटक्के , शिक्षक वर्ग,ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.









