केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांची बारामतीतील आयसीएआर-एनआयएएसएमला भेट!
नैसर्गिक शेती व ‘खेत बचाओ अभियान’चे कौतुक
बारामती, दि. २७ जून : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री श्री. रामनाथ ठाकूर यांनी शनिवारी आयसीएआर-राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था (ICAR-NIASM), बारामती येथे भेट देऊन संस्थेच्या विविध संशोधन उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरीहितासाठी राबविण्यात येणाऱ्या संशोधन कार्याचे कौतुक करत वैज्ञानिकांनी अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
भेटीची सुरुवात संस्थेच्या परिसरात पिंपळ (Ficus religiosa) वृक्षारोपणाने झाली. त्यानंतर त्यांनी आयसीएआर-एनआयएएसएमच्या तीन प्रकाशनांचे प्रकाशन केले.
यानंतर त्यांनी नैसर्गिक शेती प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची उद्दिष्टे, विविध नैसर्गिक शेती निविष्ठा निर्मिती केंद्रे तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीची माहिती जाणून घेतली. बारामती तालुक्यातील दोन गावांमधील १६ शेतकऱ्यांच्या शेतावर हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी संस्थेतील वैज्ञानिक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी संस्थेचे संचालक डॉ. के. एस. रेड्डी यांनी २००९ पासून संस्थेने विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानाची, संशोधन कार्याची व उपलब्धींची माहिती दिली. तसेच खेत बचाओ अभियान’ अंतर्गत आजअखेर २,५०१ शेतकऱ्यांपर्यंत संतुलित खत व्यवस्थापन, रासायनिक खतांचा विवेकपूर्ण वापर आणि पर्यायी पोषण व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात आल्याचे सांगितले.
आपल्या मनोगतात श्री. रामनाथ ठाकूर यांनी संस्थेच्या स्वच्छ, हरित व पर्यावरणपूरक परिसराचे विशेष कौतुक केले. शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करत त्यांनी संशोधनाचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी गावागावांत जाऊन कार्य करण्याचे आवाहन केले. देशातील शाश्वत व हवामान-लवचिक शेतीसाठी अशा संशोधनाची मोठी गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्रांचे प्रतिनिधी, राज्य कृषी विद्यापीठांचे अधिकारी, प्रगतशील शेतकरी, आयसीएआर-एनआयएएसएमचे वैज्ञानिक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप डॉ. एन. पी. कुराडे, प्रमुख, सामाजिक व धोरण संशोधन शाळा, यांनी आभार प्रदर्शनाने झाला. यानंतर मान्यवरांसमवेत समूह छायाचित्र घेण्यात आले.









