आविष्कारातून समाजोपयोगी संशोधन, पेटंट व स्टार्टअप्सना दिशा : डॉ. दिनेश अम्मळनेरकर
शिरूरच्या सि.टी बोरा महाविद्यालयात अविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धा उत्साहात संपन्न!
पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरूर येथे दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी विभागीय *‘आविष्कार’ संशोधन प्रकल्प स्पर्धेचे* उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत २६ महाविद्यालयांतील २०० हून अधिक संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, संशोधनवृत्ती आणि समाजाभिमुख दृष्टीकोनाचे प्रभावी दर्शन घडले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सचे संचालक डॉ. दीनेश अम्मळनेरकर यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःमधील सुप्त क्षमता ओळखून त्या समाजहितासाठी विकसित कराव्यात, असे आवाहन केले. सामाजिक माध्यमे, विज्ञान-तंत्रज्ञानातील नवकल्पना तसेच प्रेरणादायी माध्यमांमधील सकारात्मक बाबींचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी संशोधनाची दृष्टी विकसित करावी, असे त्यांनी सांगितले. संशोधन करताना वास्तवाचे भान ठेवून समाजोपयोगी समस्यांवर उपाय शोधणाऱ्या कल्पनांना प्राधान्य द्यावे आणि संशोधनाचा प्रवास पेटंट, नवउद्योग (स्टार्टअप) तसेच उद्योजकतेपर्यंत पोहोचला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी ‘आविष्कार’ स्पर्धेची संकल्पना, तिची वाटचाल तसेच विद्यार्थ्यांनी विकसित केलेले संशोधन प्रकल्प, पेटंट्स आणि स्टार्टअप्स याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला चालना देऊन संशोधन संस्कृती रुजविण्यात ‘आविष्कार’ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटक शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. नंदकुमार निकम यांनी विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा, सर्जनशीलता आणि मूलभूत विचारक्षमतेला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे शैक्षणिक संशोधन समन्वयक (ARC) डॉ. सुनील भोईटे यांनी केले. स्पर्धेचे संपूर्ण नियोजन व आयोजन डॉ. योगेश सेठी यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थी, मार्गदर्शक प्राध्यापक आणि परीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेतील २०० हून अधिक संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण हे प्रमुख आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना, संशोधनातील सर्जनशीलता आणि समाजोपयोगी उपक्रमांना या स्पर्धेतून व्यापक व्यासपीठ उपलब्ध झाले असून संशोधन, पेटंट आणि स्टार्टअप संस्कृतीला चालना मिळण्यास महत्त्वपूर्ण योगदान मिळत आहे.









