बिजवडीच्या कर्मवीर विद्यालयाच्या विकासासाठी माजी विद्यार्थी संघ प्रयत्नशील— ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे!
कर्मवीर जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे लोकार्पण
दहिवडी प्रतिनिधी : २७ सप्टेंबर २०२६ ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना आपल्या गावातच शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभारलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा आज महाकाय वटवृक्ष झाला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये उपजत असलेले विविध कलागुण ओळखून त्यांना योग्य दिशा देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल. बिजवडी येथील कर्मवीर विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी संघ प्रयत्नशील असून, त्यांच्या या कार्याला आपले कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी दिली.
बिजवडी (ता. माण) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात १३९व्या कर्मवीर जयंतीनिमित्त विद्यालय इमारतीच्या नूतनीकरणासह शौचालयांच्या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ना. जयकुमार गोरे बोलत होते.
यावेळी माजी जिल्हाधिकारी विश्वास भोसले, राज्य विक्रीकर उपायुक्त डॉ. प्रमोद भोसले, रयत शिक्षण संस्थेचे सहाय्यक कायदा विभाग जनरल बॉडी सदस्य ॲड किसनराव खामकर, जगदीश निर्मळ आदी प्रमुख उपस्थित होते.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, मुख्याध्यापक राजेंद्र शिर्के यांनी ग्रामस्थ, पालक आणि माजी विद्यार्थी संघाच्या सहकार्याने देणग्या, सीएसआरसह विविध माध्यमांतून निधी उपलब्ध करून विद्यालयाचे रूपडे बदलण्याचे उल्लेखनीय काम केले आहे. डॉ. प्रमोद भोसले यांच्यासारखे अनेक माजी विद्यार्थी याच विद्यालयातून शिक्षण घेऊन मोठ्या शासकीय पदांवर कार्यरत आहेत. अमित भोसले यांनीही एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून सीएसआर निधी उपलब्ध करून विद्यालयाच्या विकासात योगदान दिले आहे.
माजी जिल्हाधिकारी विश्वास भोसले म्हणाले, दुष्काळी माण-खटाव तालुक्यात विविध सिंचन योजनांच्या माध्यमातून पाणी आणण्यासाठी ना. जयकुमार गोरे यांनी प्रयत्न केले असून, त्यांना ‘भागीरथ’ म्हणावे लागेल. राजकारणविरहित शैक्षणिक संस्था उभ्या राहणे गरजेचे असून, विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे ‘कमवा आणि शिका’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून शिक्षणातून मोठे व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. प्रमोद भोसले यांनी विद्यालयाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. मुख्याध्यापक आर. एस. शिर्के यांच्यासारख्या शिक्षकांची विद्यालयाच्या समृद्धीसाठी गरज असून, माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून विद्यालयाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
मुख्याध्यापक आर. एस. शिर्के यांनी मान्यवरांचे स्वागत करून विद्यालयाच्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय सेवेत निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या उषा संजय भोसले, सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे, अतुल जाधव, सोमनाथ भोसले, नवनाथ शिंगाडे, सरपंच राधिका शिनगारे, जनरल बॉडी सदस्य हणमंतराव भोसले, उपसरपंच ऋषिकांत भोसले, एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीचे कॉर्पोरेट ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह अमित उत्तमराव भोसले, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संदीप भोसले, उपाध्यक्ष संजय दा. भोसले, खजिनदार रुपेश भोसले यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गुंजवटे, लालासाहेब दडस सर, पत्रकार विशाल गुंजवटे, लिंगराज साखरे, एकनाथ वाघमोडे, केशव जाधव, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
आभार माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संदीप भोसले यांनी मानले.









