फलटण–खुंटे रस्त्याची चाळण, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात गेला रस्ता?
जि.प.बांधकाम विभागाकडून फलटण तालुका खड्ड्यात घालण्याचे काम? बांधकाम विभागाची मिजासदारी- बिराजदारी संपणार कधी?
फलटण :फलटण -खुंटे रस्त्याची दिवसेंदिवस होत असलेली दुरवस्था, रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे तसेच रस्त्यालगत वाढलेली झाडी यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार दिव्यांग संघटना, फलटण तालुका व प्रहार सामाजिक संघटने च्या वतीने जि.प. बांधकाम विभाग, फलटण येथील उपअभियंता यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनाद्वारे फलटण–खुंटे रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता कायमस्वरूपी व दर्जेदार रस्त्याचे कामकाज हाती घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेली झाडी, काटेरी झुडपे व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वनस्पती तात्काळ काढण्याची मागणीही करण्यात आली.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्याची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता संबंधित विभागाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी महेश बापू जगताप, अध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना, फलटण तालुका यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले.









