जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा पट वाढेल यादृष्टीने प्रयत्न करणार – कु.शिवांजली भोसले,सभापती पंचायत समिती फलटण
पंचायत समिती फलटणची दुसरी मासिक सभा खेळीमेळीत
फलटण: पंचायत समिती फलटणची दुसरी मासिक सभा मंगळवार दि.१२/०५/२०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता पंचायत समिती फलटणचे सभागृहामध्ये मा. कु. शिवांजली भोसले, सभापती, पंचायत समिती फलटण यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प फलटण, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, पाणी पुरवठा, घरकुल, शेती, पशुसंवर्धन, एमएसआरएलएम (बचत गट), समाजकल्याण, ग्रापं विभाग, एमआरईजीएस या विभागांचा व तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांच्या कामकाजांचा आढावा घेण्यात आला. तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ सुविधा पोहोचविण्यासाठी सन्मानीय लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय ठेवून कामकाज केले जाईल.
मा. सभापती यांच्या संकल्पनेतून हरित फलटण संकल्प अभियान २०२६ हे सुरु करण्यात येत आहे. सध्या पर्यावरणाचा होत असलेला -हास व तापमानात होत असलेली प्रचंड वाढ यांचेवर नियंत्रण ठेवणेसाठी वृक्ष लागवड होणे हि काळाची गरज असलेने मे व जून महिन्यामध्ये स्थानिक प्रजातीच्या विविध प्रकारच्या करंज, चिंच, आवळा, उंबर, कडूलिंब, कवट, बेल, भोकर, गुलमोहर इ. प्रकाच्या बियांचे तालुकास्तरावर पंचायत समिती येथे बीजकुंभामध्ये एकत्रित संकलन करण्याचे ठरले. सदर बियाने गोळा करणेकामी तालुक्यातील सर्व शेतकरी, नागरिक, सर्व सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांना बियाने संकलन करण्याचे आवाहन करण्यात आले. नंतर समाधानकारक पाऊस झाल्यानंतर म्हणजेच साधारण ऑगस्टमध्ये सदरचे संकलीत केलेल्या बिया डोंगराळ, माळरान व पठारी भागांमध्ये पेरण्यात येतील ज्यामुळे नैसर्गिक पध्दतीने मोठया प्रमाणात वृक्ष निर्मिती होईल. हा उपक्रम केवळ वृक्ष लागवड नसून निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याचा आणि येणा-या पिढयांसाठी हिरवेगार समृध्द पर्यावरण निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे.
राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रमांतर्गत पोलिओ लसीकरणाची माहिती देण्यात आली. गावातील पाणी तपासण्यांची माहिती देण्यात आली. मुले व मुली यांच्या जन्म दरातील तफावत दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत तालुक्यातील २६ गावांची पंचायत समिती वैभववाडी जि. सिंधुदूर्ग येथील गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय समितीने तपासणी केली. तालुक्यातील सर्व २६ गावांनी अभियानात अभिमानास्पद कामगिरी करुन उत्तम प्रकारचे काम केलेले आहे. याबाबत समितीने कौतुक केले.
जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांचा पट वाढेल यादृष्टीने प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. २५ वर्षे जुन्या जि.प. शाळांच्या इमारतीची माहिती संकलीत व तपासणी करुन निर्लेखन करण्याबाबत कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान (MSRLM) व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MREGS) या विभागांनी उद्दिष्टांपेक्षा अधिक कामकाज साध्य केल्याने या विभागांचे अभिनंदन करण्यात आले.
सभेचे कामकाज मा. कु. शिवांजली भोसले, सभापती, पंचायत समिती फलटण, सदस्य/सदस्या आणि श्री. प्रकाशकुमार बोंबले, सचिव तथा गट विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.









