पुणे पदवीधर मतदारसंघासाठी फलटणचे सुपुत्र श्री. रोहित अनिल राऊत यांची अधिकृत उमेदवारी जाहीर
अखिल भारतीय विद्यार्थी व पदवीधर विकास मंच, महाराष्ट्र प्रदेश यांची पत्रकार परिषद घेत घोषणा!
पुणे | दि. २९ सप्टेंबर २०२६
विद्यार्थी, युवक आणि पदवीधरांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी व पदवीधर विकास मंच, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आगामी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी श्री. रोहित अनिल राऊत यांची मंचाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
विद्यार्थी संघटनात्मक कार्यापासून विद्यापीठ आणि पदवीधर क्षेत्रातील कामापर्यंतचा दीर्घ अनुभव, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये केलेले संघटनात्मक काम तसेच पदवीधर मतदारसंघाशी संबंधित प्रत्यक्ष निवडणूक नियोजनाचा अनुभव या पार्श्वभूमीवर ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
२०१२ पासून विद्यार्थी व युवा क्षेत्रात सक्रिय
श्री. रोहित अनिल राऊत यांनी सन २०१२ पासून विद्यार्थी क्षेत्रात सक्रियपणे काम केले आहे. विद्यार्थी परिषदेत सुमारे ९ वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्यांनी विविध जिल्हे व विभागांमध्ये प्रत्यक्ष संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या.
त्यांच्या कार्यकाळात मुधोजी महाविद्यालय, फलटणचे अध्यक्ष, फलटण शहरमंत्री, मुधोजी महाविद्यालय विद्यार्थी परिषदेचे सचिव तसेच शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे सचिव म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर सांगली महानगर, अहिल्यानगर जिल्हा, पुणे विभाग, सोलापूर विभाग आणि महाराष्ट्र प्रदेश स्तरावर विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या.
विद्यापीठ व पदवीधर क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव
सन २०२३ ते २०२६ या कालावधीत विद्यापीठ विकास मंच, महाराष्ट्रचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक म्हणून त्यांनी सुमारे तीन वर्षे पूर्णवेळ काम केले.
या कालावधीत महाराष्ट्रातील ११ पैकी ९ शासकीय विद्यापीठांच्या सिनेट निवडणुकांशी संबंधित संघटनात्मक कामाचा अनुभव त्यांना मिळाला. पदवीधर मतदार नोंदणी, गावोगावी कार्यकर्ता जोडणी, पदवीधर मेळावे, मतदार संपर्क, मतदान केंद्रनिहाय नियोजन तसेच पसंतीक्रम मतदानाच्या संघटनात्मक नियोजनात त्यांनी काम केले.
या कामाचा अनुभव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ या विद्यापीठांशी संबंधित कामात राहिला आहे.
विद्यार्थी–युवा–पदवीधर प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा
शैक्षणिक प्रश्न, उच्च शिक्षण, रोजगार, शिक्षक भरती, स्पर्धा परीक्षा, कौशल्यविकास आणि पदवीधरांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने, जनजागृती, रोजगार मेळावे, मार्गदर्शन उपक्रम आणि संघटनात्मक पाठपुरावा करण्याचा श्री. राऊत यांचा अनुभव आहे.
त्याचबरोबर MPSC/UPSC मार्गदर्शन केंद्रांसाठी पुढाकार आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग राहिला आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी पुढील भूमिका
पदवीधरांच्या प्रश्नांवर सातत्यपूर्ण संवाद, उच्च शिक्षण क्षेत्रातील समस्यांचा पाठपुरावा, रोजगार व कौशल्यविकासाच्या संधी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांचे प्रश्न आणि पदवीधरांचा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील सहभाग या विषयांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याची भूमिका मंचाने व्यक्त केली आहे.
“पदवीधरांचा प्रश्न हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता सातत्याने मांडला आणि त्याचा पाठपुरावा केला पाहिजे,” या भूमिकेतून मंचाने श्री. रोहित अनिल राऊत यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी व पदवीधर विकास मंच आगामी काळात पुणे पदवीधर मतदारसंघातील पदवीधरांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा, समस्या आणि प्रमुख प्रश्नांचा आढावा घेणार आहे.









