श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवड येथे आंतरराष्ट्रीय ई- परिषदेचे आयोजन
बुधवार दि. 5 ऑगस्ट रोजी भूगोल विभागाकडून आयोजन
म्हसवडः येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयात बुधवार दि. 5 ऑगस्ट 2026 रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत भूगोल विभाग व आयक्यूएसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे माजी सभापती, फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अशी माहिती प्राचार्य डॉ. विकास काकडे यांनी दिली.
या परिषदेचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे करणार आहेत. या परिषदेचे आयोजन फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य व सीडीसीचे व्हाईस चेअरमन ॲड. श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
या परिषदेसाठी बीजभाषक म्हणून शालीसबरी युनिव्हर्सिटी युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचे व्हिजिटिंग प्रोफेसर डॉ. प्रवीण सप्तर्षी हे उपस्थित राहणार आहेत. तर साधन व्यक्ती म्हणून डॉ.जावेद आलम हे इथोपिया, दक्षिण आफ्रिका या देशातील एडोला ब्ल्यू होरा युनिव्हर्सिटी मधील मानसशास्त्र विभागप्रमुख म्हणून उपस्थित रहाणार आहेत. तर डॉ. बापूराव राउत हे प्रोफेसर व हेड भूगोलशास्त्र विभाग वसुंधरा कला महाविद्यालय सोलापूर येथून उपस्थित राहणार आहेत. तर डॉ.कासेल दाबवान हैअल बाह प्रायव्हेट कॉलेज सायन्स, सौदी अरेबिया मार्गदर्शन करणार आहेत.
या महाविद्यालयात ‘इंटीग्रीटिंग नॉलेज फॉर इनोवेशन सस्टनॅबीलीटी अँड ग्लोबल डेव्हलपमेंट’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन होत असून त्यामध्ये सुमारे साडे चारशे संशोधक प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला आहे. अशी माहिती या परिषदेचे संयोजक व भूगोलशास्त्र विभागप्रमुख डॉ. शरद टिळेकर यांनी दिली. या परिषदेसाठी महाविद्यालयातील सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.अशी माहिती आयक्यूएसीचे कॉर्डिनेटर प्रा. रणवरे देवेंद्र यांनी दिली. या परिषदेच्या माध्यमातून संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या व्यक्त होणाऱ्या विचारातून आंतरविद्याशाखीय बहुविद्याशाखीय नाविन्यपूर्ण संशोधनाने अनेक ज्वलंत प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. तरी जास्तीत जास्त प्राध्यापक संशोधकांनी या परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन या परिषदेचे संयोजक डॉ. शरद टिळेकर यांनी आवाहन केले आहे.









