श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच लागणार?
गावोगावी मयत सभासद वारस नोंदी करण्याचे प्रशासनाकडून काम सुरू!
फलटण : श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि मतदानाच्या याद्यांमधील सदोषतेमुळे निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
निवडणूक स्थिती: निवडणुकीबाबत कोणतीही ताजी अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, परंतु सध्या कारखाना प्रशासनामार्फत गावोगावी मयत सभासदांच्या वारस नोंदी करण्यासाठी जाहीर नोटीस लावून जन जागृती करण्यात येत आहे. या मयत वारस सभासदांना मतदान प्रक्रियेत भाग घेता येणार का? हे ही पुढील काळात स्पष्ट होईल.
या कारखान्यावर माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर गटाची सत्ता होती.
निवडणुकीच्या याद्यांमध्ये त्रुटी असल्याचा दावा करत निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी सुरू असून लवकरच सुनावणी पूर्ण होऊन आगामी काही महिन्यात कारखान्याची निवडणूक लागू शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे.
यामुळे आगामी काळात गावगाड्यात ग्रामपंचायत निवडणूक पूर्वी श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागू शकते. त्यामुळे सत्ताधारी राजे गट व खासदार गटात पुन्हा एकदा राजकीय टशन पाहायला मिळणार आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सत्ता परिवर्तन करण्यासाठी लढतील तर सत्ताधारी राजेगट हा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता टिकवण्यासाठी लढतील.









