टाकळवाडे येथे जमिनीच्या वादातून एकास मारहाण प्रकरण!
न्यायालयाने सुनावली आरोपी पिता पुत्राला 1 दिवसाची पोलीस कोठडी!
फलटण – शेतजमिनीच्या वहिवाटीच्या वादातून ऊस तोडणीच्या कारणावरून एका शेतकऱ्यावर टिकावाच्या दांड्याने व कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण झाल्याची घटना फलटण तालुक्यातील टाकळवाडे येथे घडली होती.
याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनाक्रम ,अर्जुन आण्णा नाझीरकर वय 54, रा. टाकळवाडे, ता. फलटण यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांचा व भाऊ तात्याराम आण्णा नाझीरकर यांच्यात शेतजमिनीच्या वहिवाटीवरून वाद असून त्याबाबत न्यायालयात दिवाणी दावा प्रलंबित आहे.
दि. 21 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास तात्याराम नाझीरकर हे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार त्यांच्या शेतातील ऊस तोडत असल्याचे समजल्याने अर्जुन नाझीरकर शेतात गेले. त्यावेळी ऊस तोडू नका, असे सांगितल्यावर “हे शेत माझे आहे, मध्ये पडलास तर जीवे मारेन,” अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यानंतर दुपारी सुमारे 3.15 वाजता शेजारील ओढ्यात नेऊन ऊस कुटी मशीनने कुटला जात असताना पुन्हा जाब विचारल्याने संतोष तात्याराम नाझीरकर यांनी टिकावाच्या दांड्याने डोक्यावर मारहाण केली, तर तात्याराम नाझीरकर यांनी कुऱ्हाडीच्या तुंब्याने डाव्या हाताच्या कोपरावर व उजव्या हातावर वार केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.तसेच खाली पडल्यानंतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून व शिवीगाळ केल्याची तक्रार करण्यात आली होती.तात्याराम नाझीरकर व संतोष तात्याराम नाझीरकर या पिता पुत्रांवर गुन्हा दाखल झाला होता.
त्यानंतर तक्रारदार अर्जुन नाझीरकर यांनी बारामती येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतले असता डॉक्टरांनी त्यांना उजव्या हाताचे बोटाचे हाड फ्रॅक्चर झाले असल्याचा अहवाल दिला असता. सरकारी तपासणी अंती आरोपींना तत्काळ अटक करून आज दिनांक 6 जुलै 2026 रोजी पोलिसांनी फलटण येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासी अधिकारी पोलिस हवालदार सागर अभंग पुढील तपास करीत आहेत.









