सोनगावच्या जि. प. राजाळा सर्कल शाळेच्या जागेचा प्रश्न गंभीर!
शाळे शेजारील शेतकऱ्यांच्या अतिक्रमणाने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका; शाळा समितीचे तहसीलदारांना निवेदन!
फलटण: अर्जदार :- शाळा व्यवस्थापन समिती, राजाळा सर्कल, ता. फलटण, जि. सातारा
विषय :-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजाळा सर्कल येथील शाळेच्या जागेची हद्द कायम करून अतिक्रमण हटविणे व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक कंपाऊंड करणेबाबत.
महोदय,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजाळा सर्कल (सोनगाव), ता. फलटण येथील शाळा शेती महामंडळ व जिल्हा परिषद सातारा यांच्या कराराने शेती महामंडळाच्या जागेमध्ये आहे. सदर शाळेच्या जागेच्या शेजारील काही शेतकऱ्यांकडून अतिक्रमण झाल्यामुळे शाळेच्या जागेची अधिकृत हद्द स्पष्ट राहिलेली नाही. त्यामुळे शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शाळेच्या भोवती भिंतीलगत ऊसाची शेती असल्यामुळे साप व इतर विषारी प्राणी/वन्यजीव शाळेच्या परिसरात येण्याची शक्यता आहे. शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांचा दिवसभर सतत वावर असतो. वर्गामध्ये ये-जा करणे, मधल्या सुट्टीत खेळणे, तसेच शालेय उपक्रमांसाठी विद्यार्थी शाळेच्या परिसरात असतात. त्यामुळे साप किंवा इतर विषारी प्राण्यांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
तसेच, याच गटामध्ये काही दिवसापूर्वी दिनांक २०-८-२०२६ रोजी एका व्यक्तीस सर्पदंश झाल्याची घटना घडलेली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी शाळेच्या परिसरातही साप आढळून आलेला आहे. त्यामुळे सदर बाब केवळ संभाव्य धोका नसून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
शाळेच्या जागेभोवती अतिक्रमण, ऊसाची शेती व झाडे-झुडपे असल्यामुळे शाळेचा परिसर पूर्णपणे सुरक्षित व संरक्षित राहिलेला नाही. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शाळेच्या जागेची अधिकृत मोजणी करून हद्द कायम करणे, अतिक्रमणाची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करणे आणि शाळेच्या संपूर्ण परिसरास संरक्षक कंपाऊंड /भिंत करून देणे अत्यंत आवश्यक आहे.
तरी आपण सदर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यां मार्फत शाळेच्या जागेची हद्द कायम करून घ्यावी, अतिक्रमणाबाबत योग्य ती कार्यवाही करावी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेच्या भोवती संरक्षक कंपाऊंड /भिंत करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, ही नम्र विनंती.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असल्याने सदर कामास प्राधान्याने व तातडीने कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.
आपला विश्वासू
शाळा व्यवस्थापन समिती जि.प.शाळा सर्वा मा. फलटण जि.सातारा
प्रत माहितीसाठी :-
१) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
२) मा. ग्रामविकास व पंचायत राज समिती, महाराष्ट्र राज्य
३) मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, मा. आमदार, विधान परिषद
४) मा. श्री. सचिन पाटील, आमदार, फलटण-कोरेगाव विधानसभा
५) मा. जिल्हाधिकारी, सातारा
६) मा. प्रांताधिकारी, फलटण
७) मा. तहसिलदार, फलटण
८) मा. स्थावर व्यवस्थापक तथा तहसिलदार, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, साखरवाडी
९) मा. गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, फलटण
१०) मा. अभिजित दिपके, संस्थापक, सी.जे.पी.
यांना निवेदने पाठवण्यात आलेली आहेत.
प्रकरण असे असले तरी शाळेच्या शेजारी शेती असणाऱ्या शेतकऱ्याची याबाबत प्रतिक्रिया येणे अजून बाकी आहे.









